अयोध्या: मुस्लिम घाबरले, अनेकांच्या घराला कुलूप: इक्बाल अन्सारी

अयोध्या: मुस्लिम घाबरले, अनेकांच्या घराला कुलूप: इक्बाल अन्सारी

अयोध्या (लखनऊ): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सध्या संपूर्ण देशभरात सुरु आहे. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. यामुळे अयोध्येत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आजही 1992 मधील विध्वंसाची भीती तिथल्या स्थानिकांच्या मनात आहे. त्यामुळेच अयोध्येतील अनेक मुस्लिमांनी काही काळासाठी अयोध्या सोडणं पसंत केलं आहे.

अयोध्या वादाचे याचिकाकर्ते आणि बाबरी मस्जिदचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. त्यांनी स्थानिक मुस्लिमांच्या मनात काय सुरु आहे, याबाबतची माहिती दिली.

“अयोध्येत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी केल्याचं” इक्बाल अन्सारी यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.

इक्बाल अन्सारी म्हणाले, “जेव्हा अयोध्येत गर्दी वाढते, तेव्हा काही ना काही वाईट घडते असे इथल्या लोकांचा समज आहे. आता शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून इथे कार्यक्रम घेतला जात आहे. यामुळे मुस्लिम बांधव घाबरलेले आहेत, काहीजण घराला कुलूप लावून निघूनही गेले आहेत”.

उद्धव ठाकरे येत आहेत त्यांनी दर्शन घ्यावे, पूजा करावी, त्याला आमचा काहीच विरोध नाही, ती त्यांची श्रद्धा आहे. पण 1992 सालची परिस्थिती निर्माण होऊ नये, अशीही भीती मनात आहे, असे अन्सारी यांनी सांगितले.

यावेळी अन्सारी यांनी 1992 मध्ये झालेल्या हिंसाचाराची आठवण करुन दिली. त्यावेळीही इथे मोठ्या संख्येने लोक जमले होते, खूप गर्दी अयोध्येत झाली होती. त्यातून हिंसाचार घडला, मुस्लिमांची घरे जाळली, मस्जिद तोडण्यात आलं, इतर अनेक घटना त्यावेळी घडल्या होत्या, अशी आठवण अन्सारींनी सांगितली.

मी पोलिसांना दहा दिवस आधीच आमच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी विनंती केल्याचं अन्सारी म्हणाले. बाहेरुन लोक येणार आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, कदाचित लोक आक्रमक होऊन काही विपरित घडू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त सुरक्षा असणे गरजेचे आहे. सरकार आपले काम व्यवस्थित पार पाडत आहे यात काही शंका नाही, असंही इकबाल अन्सारी म्हणाले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI