‘…मग माझी चप्पल बोलेल’; आमदार हितेंद्र ठाकूर यांचा कोणाला इशारा?
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये यंदा मोठी चुरस रंगणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं कोणाची विकेट पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशातच यावर हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण यंदाच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार यात आता काही शंका नाही. कारण महायुती किंवा महाविकास आघाडीकडून कोणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळं 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं आता मतदान होणार आहे. त्यामुळे एकाचा पराभव अटळ आहे. आता बहुजन विकास आघाडीच्या 3 मतांना जास्त महत्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर घोडेबाजारावर बोलताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
जो आमच्या विभागाच्या विकासासाठी मदत करेल त्याच्यासोबत आम्ही राहणार असे बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे. या निवडणुकीत मत फोडण्यासाठी जो घोडेबाजार चालेल त्यात आमचा काही संबंध नसेल. घोडेबाजारचा जर कोणी आमच्यावर आरोप केला तर मग माझी चप्पल बोलेल असा थेट इशाराच हितेंद्र ठाकूर यांनी tv9 शी बोलताना दिला आहे.
मागच्या निवडणुकीत आम्ही आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांना आम्ही मदत केली. भाई जगताप, रामराजे निंबाळकर, काँग्रेस राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या उमेदवारांना आमची भूमिका विचारु शकतात. आम्ही भाजपाला मदत करतो म्हणून भाजपा लोकांची दिशाभूल करत आहे. लोकसभा निवडणुकीत आमचे नाव घटकपक्ष म्हणून टाकले पण ते केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी टाकली. जर आम्ही त्यांना मदत केली असती तर आम्ही लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचा उभा केला नसता, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.
1990 पासून मी तिकडे बसलो आहे तेव्हापासून आजपर्यंत माझ्याबद्दल कोणी साधा ब्र ही काढला नाही. त्यामुळे घोडेबाजार वगैरे विषय माझ्या बाबतीत कुणी करू नये अशी सगळ्यांना विनंती आहे. पत्रकारांना पण विनंती आहे तुम्ही जे काही आरोप करायचे ते डायरेक्ट पुराव्यानिशी करा मी काय माझ्या कोणत्याही आमदाराने सुद्धा अशा फालतू धंद्यात कधी भाग घेतला नाही म्हणून आम्ही जोरात बोलू शकतो, असंही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.
