हॉटस्टारवर मराठी भाषा का नाही, मनसे कार्यकर्ते आक्रमक, थेट हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले
सध्या मनसेचे काही पदाधिकारी हे हॉटस्टारच्या लोअर परळ या ठिकाणी असलेल्या कार्यालयात धडकले आहेत. अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक हे नेते यावेळी उपस्थितीत होते.

हॉटस्टारवर क्रिकेट प्रक्षेपण करताना मराठी समालोचनाचा पर्याय का उपलब्ध नाही, हॉटस्टारवर मराठी भाषा का नाही, यामुद्द्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. सध्या मनसेचे काही पदाधिकारी हे हॉटस्टारच्या लोअर परळ या ठिकाणी असलेल्या कार्यालयात धडकले आहेत. अमेय खोपकर, संतोष धुरी, केतन नाईक हे नेते यावेळी उपस्थितीत होते. यावेळी मनसे नेते अमेय खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
गेल्या तीन तासांपासून मनसेचे कार्यकर्ते हे हॉटस्टारच्या कार्यालयात बसले आहेत. त्यांच्याकडून सातत्याने हॉटस्टारवर क्रिकेट प्रक्षेपण करताना मराठी समालोचनाचा पर्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मनसे नेते आक्रमक झाले आहेत. यानंतर आता हे सर्व मनसेचे कार्यकर्ते हे थेट आत शिरले आहेत. हॉटस्टारचे ऑफिस हे २६ व्या मजल्यावर आहे. हॉटस्टारच्या व्यवस्थापनाने लिफ्ट बंद केली आहे. अद्याप हॉटस्टारने याबद्दल लेखी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे मनसे नेते आक्रमक झाले आहे.
आम्हाला आक्रमक व्हायला भाग पाडलं, मनसेचा संताप
आम्हाला आक्रमक व्हायला भाग पाडलं आहे. याबद्दल कोणीही काहीच ठोस भूमिका घेत नाही. जवळपास दोन तासांपासून आम्ही बसलो आहोत. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागंत आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेत्याने दिली.
“महाराष्ट्रात आम्हाला मराठी भाषेसाठी भांडावं लागतं”
“मी भेटायला आलो नव्हतो. धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रात मराठी भाषा वापरावी, यासाठी जर का आंदोलन करावं लागत असेल, तर याच्यासारखी शोकांतिका नाही. महाराष्ट्रात आम्हाला मराठी भाषेसाठी भांडावं लागतं आणि इथे आल्यानंतर हे लोक मराठी माणसाला पुढे करतात. याचा अर्थ दोन मराठी माणसांनी भांडत बसायचं. जे कोणी गुप्ता आहेत, ते यांना वरुन ऑर्डर देणार. आम्ही इथे आलो होतो आणि त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत तुमच्याकडून लेखी स्वरुपात काही मिळत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही. आता हॉटस्टारने लेखी स्वरुपात आम्हाला पत्र दिलं आहे. येत्या ICC ट्रॉफीपासून क्रिकेटचे मराठीत समालोचन सुरु होईल, असे हॉटस्टारने सांगितले आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी माणसानेच माज करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही”, असे अमेय खोपकर म्हणाले.
फक्त आता आम्ही ते लवकरात लवकर करु – हॉटस्टारची प्रतिक्रिया
“लवकरच आम्ही मराठी समालोचन सुरु करणार आहोत. आमच्या प्लॅनमध्ये हे होतं. फक्त आता आम्ही ते लवकरात लवकर करु”, असे हॉटस्टारमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.
तर आम्ही १०० टक्के चर्चा केली नसती
“मराठी सोडून हॉटस्टारवर तमिळ. तेलुगु, हरियाणा, पंजाब, कन्नड अशा सर्व भाषा आहेत. मग मराठी नको का? कोणतंही आंदोलन असेल तर हे मराठी लोकांना पुढे करतात. जर इथे मराठी अधिकारी आला नसता तर आम्ही १०० टक्के चर्चा केली नसती, आज चित्र वेगळं असतं. आम्ही मराठी भाषेची गळचेपी अजिबात सहन करणार नाही”, असे अमेय खोपकर यावेळी म्हणाले.
