Sandip Deshpande: …तर भिंतीवर सोडा, कपाळावर मोदींचा फोटो चिकटवेल, संदिप देशपांडे यांचा मोठा दावा
Sandeep Deshpande on Narendra Modi: गेल्या दोन दिवसांपासून भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसेत मोठा राडा पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर हटवल्यानंतर या वादाला तोंड फुटले आणि आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा दावा केला.

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तसबीर लावल्यावरून मोठा वाद पेटला. मोदींचा फोटो काढण्यात आल्यानंतर भाजप आणि मनसेमध्ये वाद उफाळला. त्यानंतर काल तर माहिमध्ये भाजप आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले. तुफान राडा झाला. आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या वादावर पुन्हा भाष्य केले. सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा दावा केला. त्यावर आता भाजपमधून काय प्रतिक्रिया उमटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रोटोकॉल चुकला यात वाद नाही
विद्यार्थ्यांना निकृष्ट पद्धतीचा आहार देण्यात येत होता. विद्यार्थीनींना कोणत्याही प्रकारची सुविधा देण्यात येत नव्हती. महाविद्यालयांची दुरावस्था झालेली आहे, त्यावर भारतीय जनता पार्टी काही बोलणार आहे की नाही? हा खरा प्रश्न आहे. उरला प्रश्न फोटोचो तर त्यासंदर्भातील प्रोटोकॉल अत्यंत क्लिअर आहे. राष्ट्र पुरुषांच्या बाजूला सध्याच्या नेत्याचे फोटो लागायला नको, एखाद इंच फोटो खाली असेल तर चालू शकते. प्रोटोकॉलनुसार पहिला राष्ट्रपतींचा फोटो पाहिजे आणि नंतर पंतप्रधानांचा हवा. प्रोटोकॉल चुकला का? तर यात काही वाद नाही, असा दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.
तर मोदींचा फोटो कपाळाला चिकटवेल
माझं तर उलट आवाहन आहे की भाजपने महाराष्ट्रातील सगळ्या शाळा चांगल्या कराव्यात. सगळीकडे शिक्षक भरती व्हावी. लोकांच्या समस्या सोडवाव्यात. 2014 मध्ये आम्हाला जे आश्वासन दिलं होतं, आमच्या प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील. ते त्यांनी द्यावे. 2 कोटी रोजगार तरुणांना देण्यात येणार होते. ते त्यांनी द्यावेत. जगातील सर्वात सशक्त अर्थव्यवस्था करणार होतात. ती त्यांनी करावी. विकसनशील भारताला विकसीत भारताला नेणार होतात. ते करावं. त्यांनी या गोष्टी जर केल्या. तर भिंतीवर सोडा मी माझ्या कपाळावर इथे नरेंद्र मोदी यांचा फोटो चिकटवून फिरेल. मग तर खूष होतील ना, असा टोला त्यांनी लगावला.
तर त्याचवेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. लोकांची कामचं होत नाही, उलट याचा पक्ष फोड, त्याचा पक्ष फोड हे सुरू आहे. याच्यापेक्षा रस्ते चांगले करा. खड्डेमुक्त रस्ते करा. कशाला कोणी तुमच्या फोटोवर आक्षेप घेतील. लोक मोदींचा फोटो कपाळावर लावून फिरतील. अशी हिंमत भाजपकडे आहे का? असेल तर त्यांनी बोलावं असे आवाहनही देशपांडे यांनी दिले.
पुणे दौऱ्यादरम्यान शिवाजीनगर येथील एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्याच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो शेजारीच पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. मनसे नेते अमित ठाकरे यांनी हा फोटो काढण्यास सांगितले. त्यानंतर दोन कार्यकर्त्यांनी हा फोटो काढला. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तर या प्रकारावरून भाजप आणि मनसे आमने-सामने आले. हा वाद चिघळला.