ते तर मंत्रिमंडळातील कच्च मडकं; शिंदे -फडणवीस माफी मागा, संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : मनसे आणि ठाकरे शिवसेनेच्या विजयी मेळाव्यापूर्वी संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला केला. कालच्या 'जय गुजरात' या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.

ते तर मंत्रिमंडळातील कच्च मडकं; शिंदे -फडणवीस माफी मागा, संजय राऊतांचा घणाघात
संजय राऊत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 05, 2025 | 10:41 AM

महाराष्ट्रातील राजकारणाला थोड्याच वेळात कलाटणी मिळणारी घटना घडणार आहे. 18 वर्षांनी दोन्ही ठाकरे राज्यात एकाच मंचावर दिसतील. मराठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्दावर दोन्ही ठाकरे आज वरळी डोम येथे विजयी मेळाव्यानिमित्त एकत्र येत आहेत. त्यापूर्वीच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला केला. कालच्या ‘जय गुजरात’ या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. दोघांवरही कडवट टीका केली.

शिंदे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या मंत्रिमंडळातील कच्चं मडकं असल्याची खोचक टीका राऊतांनी केली. काल त्यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा दिला होता. फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ते अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप राऊतांनी केला. फडणवीस हेच शिंदेंना गोत्यात आणत असल्याचे ते म्हणाले.

गुजराती बांधवांनी महाराष्ट्रात विकास कामे केली मग पैसे नाहीत का कमावले, असा सवाल त्यांनी केला. संपत्ती नाही कमावली का, मग ते उपकार करत आहेत का? असा उलट सवाल त्यांनी केला. मुंबई उभारणीत सर्वात मोठे योगदान पारशी समाजाचे आहे. मराठी माणसानं नाही केला का विकास, तुम्ही असे बोलून मराठी माणसाचा अपमान करत नाहीत का? असा सवाल राऊतांनी केला.  त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.

शिंदे -फडणवीस माफी मागा

मिस्टर शिंदे, तुम्ही मराठी माणसाचा अपमान करत आहात. ही मुंबई मराठी मजूर, श्रमिक, गिरणी कामगार यांच्या रक्तातून आणि घामातून निर्माण झाली आहे. या शेठजींच्या पैशातून नाही निर्माण झाली. शिंदेंनी उगाच काहीही स्पष्टीकरण देऊ नये. एकनाथ शिंदे यांनी सर्वात अगोदर माफी मागायला हवी. तर शिंदेंची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल फडणवीसांनी पण माफी मागायला हवी अशी मागणी राऊतांनी केली. फडणवीस जितके बोलतील तितके ते अडचणीत येतील. त्यांनी शांत राहणेच योग्य असल्याचा टोला राऊतांनी यावेळी लगावला.