‘फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणतायेत’, संजय राऊतांच्या त्या दाव्याने एकच खळबळ

Sanjay Raut on CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकनाथ शिंदेंना अडचणीत आणत असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे. मनसे आणि ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणतायेत, संजय राऊतांच्या त्या दाव्याने एकच खळबळ
संजय राऊत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 05, 2025 | 10:11 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणत असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मनसे आणि ठाकरे सेनेचा विजयी मेळावा वरळी डोम येथे होत आहे. या मेळाव्यापूर्वी राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेचा चांगलाच समाचार घेतला. पाऊस नसता तर हा मेळावा शिवतीर्थावर झाला असता असे राऊत म्हणाले.

‘आमच्या विधायक गुंडगिरीने तुम्ही मुख्यमंत्री’

मनसैनिकांनी परवा एका विक्रेत्याला मराठीच्या मुद्यावरून मारहाण केली होती. त्यानंतर व्यापार्‍यांनी मोर्चा काढला होता. मराठी भाषेच्या आग्रहासाठी गुंडगिरी सहन करणार नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर खासदास संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिला. शिवसेनेने त्यावेळी गुंडगिरी केली. त्यामुळे मुंबईत मराठी आणि मराठी माणूस शाबूत राहिला. आमच्या विधायक गुंडगिरीने तुम्ही मुख्यमंत्री आहात, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

पण ते जय महाराष्ट्र म्हणत नाहीत

गुजरातमधील बडोद्यात गायकवाडांचे राज्य होते. इंदुरमध्ये होळकरांचे राज्य होते. म्हणून अमित शाह आणि नरेंद्र मोदी बडोद्यावर गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. इंदूर आणि ग्वाल्हेर ही मराठी राज्य आहेत होळकर आणि शिंद्यांची, फडणवीसांना सांगू इच्छितो की पेशवे पण तिकडेच गेले होते उत्तरेत. लखनौच्या कानपूरच्या पुढे पिठूरला. इतिहास मलाही माहिती आहे, त्यांच्या पेक्षा. येथे मराठी लोकांनी राज्य केले म्हणून योगी आदित्यनाथ तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाहीत, असा टोला संजय राऊतांनी शिंदे यांना लगावला.

फडणवीस शिंदेंना अडचणीत आणतायेत

उगाचच एकनाथ शिंदे यांनी सारवासारव करू नये. महाराष्ट्राला अपमानित करू नका. खरं म्हणजे फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणतायेत. त्यांना उत्तेजन देत आहेत. त्यांना वारंवार अशा भूमिका घ्यायला लावत आहेत. फडणवीस हेच त्यांना अडचणीत आणत असल्याचा दावा राऊतांनी पत्रकार परिषेदत केला. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रमात जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर जय गुजरात म्हटले होते. त्यानंतर वादंग उठले होते. त्यावर गुजरात हे काही पाकिस्तान नाही. गुजराती बांधवांच्या मुंबई, महाराष्ट्राच्या विकासात योगदान असल्याचे शिंदे सेनेने म्हटले होते. त्याचा समाचार राऊतांनी आज घेतला. फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ते अशी भूमिका घेत असल्याचा दावा राऊतांनी केला.