नाट्यगृह आता ‘रिंगटोनमुक्त’, मोबाईल जॅमर बसवण्याचा बीएमसीचा निर्णय

मुंबई महापालिकेने आता नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाट्यगृह आता 'रिंगटोनमुक्त', मोबाईल जॅमर बसवण्याचा बीएमसीचा निर्णय

मुंबई : नाट्यगृहामध्ये मोबाईल सायलेंटवर ठेवण्याची सूचना वारंवार करुनही काही हेकेखोर प्रेक्षक बधत नसल्यामुळे मुंबई महापालिकेला रामबाण उपाय शोधावा लागला आहे. बीएमसीने नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय (Mobile Jammer in BMC Theaters)  घेतला आहे.

नाटकाचा प्रयोग सुरु असताना मोबाईल वाजल्यावरुन अभिनेता सुबोध भावे, सुमित राघवन यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली होती. प्रत्येक प्रयोगाच्या आधी प्रेक्षकांना मोबाईल सायलेंटवर किंवा स्विच्ड ऑफ करण्याची कळकळीची विनंती केली जाते. तरीही काही प्रेक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे सर्वच प्रेक्षकांना फटका बसतो.

शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी ठरावाच्या सूचनेद्वारे नाट्यगृहात जॅमर बसवण्याची मागणी केली होती. अखेर, पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या नाट्यगृहांमध्ये लवकरच मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनेक वेळा प्रयोग सुरु असताना मोबाईल वाजतो आणि प्रेक्षक नाटक सुरु असतानाच भोवतालची पर्वा न करता मोबाईलवर मोठमोठ्याने बोलतात, असा अनुभव अनेक कलाकार सांगतात. या प्रकारामुळे कलाकारांचं लक्ष विचलित होतं. काही कलाकारांनी प्रयोग अर्ध्यावर थांबवण्याचा पवित्राही (Mobile Jammer in BMC Theaters) घेतला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI