MPSC मधील मास कॉपी ‘व्यापम’पेक्षाही गंभीर : सत्यजित तांबे

MPSC मधील मास कॉपी 'व्यापम'पेक्षाही गंभीर : सत्यजित तांबे

मुंबई : एमपीएससी परीक्षेतील मास कॉपीचा मुद्दा आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उचलला आहे. एमपीएससी परीक्षेतील मास कॉपी म्हणजे मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही गंभीर असल्याचा गंभीर आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सत्यजित तांबे यांनी एमपीएससीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात झालेल्या परीक्षांमधील आकडेवारीच मांडली. तसेच, एमपीएससीमधील मास कॉपी प्रकरणी केवळ आरोप करुन सत्यजित तांबे थांबले नाहीत, तर या प्रकरणी हायकोर्टातही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“जसा मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा झाला, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात एमपीएससीच्या निमित्ताने व्यापम घोटाळा उघडकीस आला आहे. एमपीएससीच्या परीक्षेत प्लॅनिंगने मास कॉपीचा प्रकार सुरु झाला आहे. 2017-18 पासून मुलांना त्यांच्या मोबाईल नंबरचाच सीट नंबरमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रकार सुरु झाला आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षात मुलं दोन-दोन मोबाईल विकत घेतात, त्यांचे सीरीजचे नंबर एकामागोमाग येतात आणि तीच मुलं पास होत आहेत. आता या प्रकाराची संख्या वाढत चालली आहे.” असे सांगत युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी गेल्या काही परीक्षांमधील आकडेवारीही पत्रकार परिषदेत मांडली.

हेही वाचा – MPSC च्या परीक्षेत ‘ग्रुप कॉपी’, अधिकारी होण्यासाठी ‘अवैध राजमार्ग’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत सरकारने सामूहिक कॉपीला उत्तेजन दिले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे, विद्यमान सरकारने जाणूनबुजून केलेला हा घोटाळा ‘व्यापम’पेक्षाही गंभीर आहे, असा आरोप करत सत्यजित तांबे यांनी पुढे सांगितले, “2017-18 पासून परिक्षार्थीच्या मोबाईल नंबरचे अखेरचे डिजिट ग्राह्य धरून सीट नंबर दिला जातो. मात्र यात अनेक उमेदवारांनी आपल्या मोबाईलची अखेरची सिरीयल आपल्याला सोयीच्या असलेल्या उमेदवाराशी मिळती जुळती करून प्रोफाईलमध्ये अपडेट केली आहे. त्यामुळे एकमेकांना मदत करू शकणारे उमेदवारांचा सीट नंबर मागे पुढे आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो निकाल आला त्यातही आशा जोड्याच बहुसंख्येने उत्तीर्ण झाल्या.”

“सरकारच्या या अक्षम्य चुकीमुळे प्रामाणिक अभ्यास करणारे ग्रामीण भागातील गरीब , मागासवर्गीय व आदिवासी उमेदवार स्पर्धेच्या बाहेर फेकले गेले आहेत. या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या नुकसानाची जबाबदारी फडणवीस सरकार घेणार का?”, असा सवालही सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे.

“17 फेब्रुवारीला होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सीट नंबर बदलून द्यावे. ते मोबाईल नंबरच्या आधारे सीट नंबर नसावेत. अन्यथा, ती परीक्षा रद्द करावी. नाहीतर आम्ही मुंबई हायकोर्टात युवक काँग्रेसच्या वतीने जनहित याचिका दाखल करणार आहोत.”, अशी माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.

VIDEO : महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी काय आरोप केले आहेत?

Published On - 7:45 am, Tue, 12 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI