नाईट लाईफ म्हणजे पब आणि बार नव्हे, आदित्य ठाकरेंनी ‘मुंबई 24 तास’ संकल्पना सविस्तर सांगितली!

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबई 24 तास’ (Mumbai night life) ही संकल्पना कशी प्रत्यक्षात येणार आहे याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:21 PM, 22 Jan 2020
नाईट लाईफ म्हणजे पब आणि बार नव्हे, आदित्य ठाकरेंनी  ‘मुंबई 24 तास’ संकल्पना सविस्तर सांगितली!

मुंबई : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबई 24 तास’ (Mumbai night life) ही संकल्पना कशी प्रत्यक्षात येणार आहे याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. येत्या 27 जानेवारीपासून मुंबई 24 तास (Mumbai night life) प्रत्यक्षात लागू होईल, अशी घोषणा आदित्य ठाकरे  आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली. “मुंबई हे जागतिक शहर आहे. नाईट लाईफ म्हणजे पब आणि बार नव्हे. विविध रोजगाराला चालना देणं, अर्थव्यवस्थेला बळकटी देणं हे यामागचा हेतू आहे”, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

“मुंबई 24 तास हा कायदा 2017 मध्येच आला आहे. मागच्या सरकारने काही कारणांमुळे तो लागू करू शकले नाही. मॉल आणि मिल कंपाऊंड येथे 24 तास सुरू राहणार आहे. मुंबईचा उत्पन्न आणि रोज निर्मितीसाठी हा निर्णय योग्य आहे. यामुळे टॅक्सी, रेल्वे यांना सुद्धा चालना मिळेल. खासगी सिक्युरिटी असेल तसेच ज्यांना पोलीस सिक्युरिटी हवी असेल त्यांना ती दिली जाईल, त्यामुळे सरकारला सिक्युरिटीचा रिव्हेन्यू मिळेल”, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

पोलिसांवर यामुळे ताण वाढणार नाही. सध्या पोलीस दुकाने उघडी की बंद तपासतात. गुन्ह्यापेक्षा दुकानांकडे पोलिसांना जादा लक्ष द्यावे लागते. मुंबई 24 तासमुळे पोलिसांचा ताण उलट कमी होईल, असं आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.

मुंबई 24 तास योजनेचे कुणावर बंधन नाही. ज्याला 24 तास दुकान उघडे ठेवायचे नाही तो बंद करु शकतो – आदित्य ठाकरे

मुंबईत रात्री अघोषित कर्फ्यू कशासाठी? मुंबई जागतिक शहर असल्यामुळे मुंबईकरांना सर्व काही हव्या ते वेळेत मिळायला हवं, असंही आदित्य ठाकरेंनी नमूद केलं. पब-बार यांसारख्यांना रात्री दीड वाजेपर्यंतची मुदत कायम असेल, असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मुंबईत सेवाक्षेत्रात 5 लाख लोक काम करतात. मुंबईत तीन शिफ्टमध्ये काम व्हावे असे वाटते. 24 तास मुंबईमुळे रोजगार, महसूल वाढेल. मॉल आणि मिल कंपाऊंड उघडे राहतील. रहिवासी भागातील दुकाने बंद राहतील. धंदा वाढवणे हे सरकारचे काम नाही. धंदा वाढीस प्रोत्साहन सरकार देते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे. महसूल, रोजगारासाठी मुंबईत 24 तास योजना आहे. मुंबईत येणारे पर्यटकही 36 तासांत निघून जातात. मुंबई 24 तास संकल्पनेमुळे ते सुद्धा थांबतील असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

रात्रीच्या अन्नपदार्थांचीही तपासणी होत राहिल. खाद्यपदार्थांचे सँपल्स वरचेवर घेत राहू. पहिल्या टप्प्यात काही मर्यादित ठिकाणी मुंबई 24 तास सुरु करण्यात येईल.

मंत्रिमंडळात मुंबई 24 तास ही चर्चा झाली. 2017 मध्येच हे मुंबई 24 तास सुरु व्हायला पाहिजे होतं. त्यावेळी क्रेडिटची बाब असेल त्यामुळे कदाचित सुरु झाला नसेल असं मला वाटतं.
मुंबई महापालिकेत 2013 मध्ये ठराव मांडला होता. मुंबईमध्ये अघोषित कर्फ्यू लावणे अयोग्य. कुठेही गोष्टी लादत नाही. 24 तास सुरू होण्यासाठी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. मुंबई 24 तासमुळे महसूल वाढणार आहे, रोजगार वाढणार आहे. विरोधकांनी  सरकारी जीआर वाचावा नंतर टीका करावी. टीका करणाऱ्यांनी अगोदर जेएनयू सांभाळावं, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी केंद्रावर टीका केली.

जे नाईट लाईफ दरम्यान कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.