नायजेरियन ‘बंटी-बबली’च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या!

  • Updated On - 3:38 pm, Fri, 5 July 19 Edited By:
नायजेरियन 'बंटी-बबली'च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या!

मुंबई : विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन त्यात स्कीमर मशीन लावून बँक ग्राहाकांना लुबाडणाऱ्या नायजेरियन बंटी-बबलीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मालाड परिसरात बँक ग्राहकांच्या एटीएममधून परस्पर लाखो रुपये काढून घेतले जात असल्याची तक्रार येत होती. या घटनेची पोलीस चौकशी करत असताना आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका एटीएम ग्राहकाचे लाखो रुपये खात्यातून वटवून घेण्याची तक्रार एका खाजगी बँकेच्या मुख्य कार्यालयाला मिळाली होती. याबद्दलची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्येही दिली होती. यानंतर पोलीस आणि बँक अधिकारी सक्रिय झाले आणि तपास केल्यावर समोर आलं की संबंधित एटीएममध्ये स्कीमर आणि मायक्रो कॅमेरा लावण्यात आला आहे. या संदर्भात समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असता गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या 4 पथकांनी मालाड परिसरातील वेगवेगळ्या एटीएम सेंटरवर स्वतः वॉचमनचा वेष परिधान करून पहारा देण्यास सुरुवात केली होती.

मालाड परिसरातील एका एटीएम सेंटरवर 13 मे रोजी पहाटे 2 वाजता इसाही ओंग्नेलू सेयी हा नायजेरियन इसम आला होता. तो एटीएमच्या आत गेला आणि पुन्हा घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आला. हे पाहून बाहेर वॉचमन म्हणून पाहाऱ्यावर असलेल्या पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. त्यावेळी या नायजेरियन आरोपीला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने पोलिसांना ढकलत तेथून पळण्याचा प्रयत्न केला. जवळपास 1 किलोमीटर पर्यंत फिल्मी स्टाईलने पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले. यानंतर त्याच्याकडे पोलिसांना स्कीमर मशीन, मायक्रो कॅमेरा आणि क्लोनिंग कार्ड मिळाले.

पोलिसांनी केलेल्या तपासात आणखीन एक नायजेरियन महिला आरोपी खरड रोझी मॉगी हिला अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गेल्या काही महिन्यांपासून नालासोपारा पूर्व येथील प्रिन्स अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या घरात राहून एटीएम मशीनमध्ये स्कीमर मशीन लावून पैसे लुटत होते. या आरोपींनी मुंबईतील आणखीन किती एटीएम मशीनमध्ये अशा प्रकारे स्कीमर लावले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.