
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागून १० दिवस उलटले आहेत. तरी मुंबईकरांना महापौर कोण होणार याची प्रतिक्षा आहे. मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचाच होणार हे स्पष्ट झाले आहे. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्ग – महिला या गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने आपला महापौर बसवण्यासाठीच्या हालचाली तीव्र केल्या आहेत. सध्या माध्यमांमध्ये अनेक नावांची चर्चा असली तरी घाटकोपरमधील नगरसेविका रितू तावडे यांचे नाव या शर्यतीत सर्वात आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
रितू तावडे या घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक १३२ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे हा मतदारसंघ गुजराती बहुल आहे. मात्र रितू तावडे या स्वतः मराठा समाजातील असून एक खंबीर मराठी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्यांना महापौरपद देऊन भाजपकडून एकाच वेळी दोन मोठे मास्टरस्ट्रोक खेळण्याचा विचार केल्याचे बोललं जात आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी महापौर असावा यावरून राजकारण चांगलेच तापले होते. मुंबईचा महापौर मराठीच असावा, या विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजप रितू तावडे यांना महापौरपदाची संधी देऊ शकते. रितू तावडे या स्वतः मराठी चेहरा असल्या तरी त्या प्रामुख्याने गुजराती मतदारांचे प्रतिनिधित्व करतात. त्या ज्या भागातून निवडून येतात, तिथे गुजराती मतदारांचे प्राबल्य जास्त असून तो भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो.
जर रितू तावडे यांना भाजपने महापौरपदाची संधी दिली, तर भाजप एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची अर्थात दुहेरी संधी साधणार आहे. एकीकडे मराठी महापौर देऊन विरोधकांच्या मराठी अस्मितेच्या राजकारणाला लगाम घालता येईल. तर दुसरीकडे गुजराती मतदारांना आपल्या हक्काचा प्रतिनिधी सर्वोच्च पदावर बसल्याचे समाधान मिळेल. हा निर्णय मुंबईच्या राजकीय पटलावर भाजपसाठी मराठी-गुजराती सोशल इंजिनिअरिंगचा एक यशस्वी प्रयोग ठरू शकतो, असे बोललं जात आहे.
रितू तावडे यांची ही नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद अत्यंत प्रभावीपणे भूषवले आहे. ५३ वर्षीय तावडे या युवा आणि आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. तसेच पक्षात असलेली पकड यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपमधील अनेक अनुभवी नगरसेविकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील नावांची चर्चा सुरू आहे:
दरम्यान बाहेरून आलेल्या नगरसेविकांपेक्षा मूळ भाजप कार्यकर्त्यालाच या पदावर संधी द्यावी, असा एक सूर पक्षात उमटत आहे. अशा स्थितीत रितू तावडे या सर्व निकषांवर सरस ठरताना दिसत आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना महापौर कोण होणार, याची उत्सुकता लागली आहे. आता आगामी काळात भाजप कोणत्या नावाची अधिकृत घोषणा करणार आणि मुंबईच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.