मुंबईच्या महापौरपदाचा पेच वाढला, एकनाथ शिंदेंनी घेतला टोकाचा निर्णय, भाजपला मोठा धक्का
मुंबई महापौरपदावरून महायुतीत कलगीतुरा रंगला आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपचा एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळून स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातच आता महायुतीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांनी आपल्या २९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपला मुंबईत आपला महापौर बसवायचा आहे, कारण त्यांच्याकडे नगरसेवकांचे संख्याबळ जास्त आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अडीच वर्षे आमचा महापौर असावा अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत एकमत होऊ शकलेले नाही. त्यातच आज दुपारी १२ वाजता शिवसेनेचे सर्व २९ नगरसेवक दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करतील. त्यानंतर हे सर्व नगरसेवक बसने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन येथे जाऊन स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी करतील. सध्या एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावी आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
अडीच वर्षांसाठी महापौरपदावर ठाम
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले होते. यामुळे भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करू नका असे स्पष्ट आदेश दिले आहेत. दुसरीकडे, शिंदे गट पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदावर ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे. मुंबईत तणाव असतानाच एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेले आहेत. भाजपच्या भूमिकेवर त्यांनी ही एक प्रकारची नाराजी व्यक्त केली आहे, असे म्हटले जात आहे.
दरम्या महापौरपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी आहे. येत्या ३१ जानेवारीला ही निवडणूक होणार आहे. त्यातच शिवसेना शिंदे गट स्वतंत्र नोंदणी करत असल्याने भाजपवर दबाव वाढला आहे. जर दोन्ही पक्षांत तडजोड झाली नाही, तर मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक अतिशय नाट्यमय होऊ शकते. ३१ जानेवारीला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडणार आहे.
भाजपला महापौर बसवणे कठीण
मुंबईत सत्ता स्थापनेसाठी ११४ हा बहुमताचा आकडा आहे. भाजपकडे ८९ तर शिंदे गटाकडे २९ नगरसेवक आहेत. शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय भाजपला महापौर बसवणे कठीण आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार का आणि त्यात महापौर पदाबद्दल सकारात्मक तोडगा निघणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
