
मुंबई: नवनीत राणा (navneet rana) आणि रवी राणा (ravi rana) ह्यांच्या हायव्होल्टेज ड्राम्याचा दुसरा अंक घडला तो त्यांच्याच घराच्या बाहेर. मुंबई पोलीस (mumbai police) त्यांना खार पोलीस ठाण्याला घेऊन जाण्यासाठी घराच्या खाली घेऊन आले. पण राणांनी घरात केलं त्याचाच पुढचा अंक घराच्या खाली घडला. बरं त्यातच मीडियाचे कॅमेरे समोर असतील तर ड्रामा घडणार नाही कसा? त्यासाठीच तर सगळा खटाटोप सुरु आहे. पोलीस ठाण्याला जाण्यासाठी राणा दाम्पत्य खाली आले आणि कॅमेरे बघून पुन्हा त्यांना त्यांच्या अंगात बळ आलं. नवनीत राणांचा एक डोळा मीडियाच्या कॅमेऱ्यावर होता तर दुसरा मुंबई पोलीसांसोबत. त्या नेमकं काय म्हणतायत याचा अंदाज फक्त येऊ शकत होता पण नेमकं सांगणे अवघड आहे. त्या घराच्या आत वॉरंट मागत होत्या. खालीही त्या वॉरंटच मागत असाव्यात. पण कारण काहीही असो, त्याच वेळेस ड्रामा सुरु झाला. तुलनेने रवी राणा हे शांत वाटत होते पण बघता बघता नवनीत राणांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तितक्यात मुंबई पोलीसांच्या लेडीज फलटणनं त्यांना हाताला धरलं आणि पोलीसांच्या गाडीपर्यंत बळजबरीनंच आणलं. तर तिथेही नवनीत राणा शांत झाल्या नाहीत. त्या गाडीच्या पायरीवर उभ्या राहील्या आणि कॅमेऱ्याकडे बघत घोषणाबाजी करायला लागल्या. मग मुंबई पोलीसांनी अक्षरश: त्यांना खाली खेचलं आणि गाडीत कोंबलं. दुसऱ्या बाजुला रवी राणा हे अजूनही शांतच होते. ते पोलीसांना काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण नवनीत राणांना गाडीत टाकल्यानंतर रवी राणाही गाडीत बसले आणि खार पोलीस ठाण्याची वारी शेवटी सुरु झाली. पण शेवटी हा हायव्होल्टेज ड्रामा घडताना महाराष्ट्रानं पाहिला.
शिवसैनिकांनी खार पोलीस ठाण्यात रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई पोलीस राणा दाम्प्त्यांच्या घरी आले. पोलिसांनी यावेळी त्यांना अटक करण्यात येत असल्याचं सांगितलं. मात्र, त्यामुळे नवनीत राणा प्रचंड भडकल्या. त्यांनी पोलिसांवरच अरेरावी सुरू केली. त्यांनी पोलिसांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्नही केला. कोणत्या नियमाखाली तुम्ही आम्हाला अटक करत आहात. तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का? वॉरंट दिल्याशिवाय हात नाही लावायचा सांगून ठेवते मी. वॉरंट आणा. त्यानंतरच आम्हाला न्या. तोपर्यंत तुम्ही मला घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा रिस्पेक्ट करते. तुम्ही येऊ नका. नियमानुसार काम करा. नियमाबाहेर काम करू नका. वॉरंट दाखवा आणि आम्हाला अटक करा. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आवाज खाली करा. आवाज खाली करा. आवाज खाली करा. मी सांगत आहे. तुम्ही आमच्या घरात येऊ शकत नाही, अशा शब्दात नवनीत राणा यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला.
नवनीत राणा यांच्या घरात हा जवळपास 15 मिनिटे ड्रामा सुरू होता. नवनीत राणा या पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. तर दुसरीकडे रवी राणा हे मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर बघून पोलिसांच्या अरेरावीवर भाष्य करत होते. आपण कसे निर्दोष आहोत आणि पोलीस कसे आम्हाला जबरदस्तीने घेऊन जात आहेत. हे सांगण्याचा त्यांचा वारंवार प्रयत्न केला. तब्बल 15 मिनिटे हे नाट्य सुरू होतं. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्यांना जबरस्ती घराच्या खाली आणलं. त्यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही कॅमेऱ्याकडे बघून राणा दाम्पत्यांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. दोघेही गाडीत बसण्यास नकार देत होते. पोलिसांशी हुज्जत घालत होते. कॅमेरा समोर असल्याने राणा दाम्पत्यांना पोलिसांशी प्रचंड हुज्जत घातली. जवळपास पाच एक मिनिटं हा गोंधळ सुरू होता. मात्र, पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत डांबलं आणि गाडी सुस्साट पोलीस ठाण्याच्या दिशेने गेले.
खार पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर या दोघांना भादंवि कलम 153 अ अंतर्गत अटक करण्यात आली. या दोघांनाही त्यामुळे आजची रात्रं पोलीस ठाण्यात काढावी लागणार आहे. उद्या किंवा सोमवारी त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांच्या जामिनावर निर्णय होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.