मुंबईची तुंबई, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांची दैना, आता पुढील 3 तास महत्त्वाचे
मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस पडत असून, वाहतूक आणि रेल्वे सेवांवर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांसाठी राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

मुंबई शहरासह उपनगरात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. सध्या मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक चाकरमान्यांची आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तारांबळ उडल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत जोरदार पाऊस
सकाळपासून मुंबई उपनगरात, विशेषतः अंधेरी, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले आणि सांताक्रूझ भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कांदिवली-मालाड पश्चिम भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र सततच्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि लिंकिंग रोडवरही पावसाचा परिणाम दिसून येत आहे. मालाड-कांदिवली लिंकिंग रोडवर मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.
तसेच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकललाही पावसाचा फटका बसला आहे. सध्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरु आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
वसईत पावसाची रिपरिप
वसई-विरारमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज ढगाळ वातावरण आहे. सध्या शहरात कुठेही पाणी साचलेले नाही. वाहतूक सुरळीत सुरू आहे. विरार पूर्वेकडील विवा जहांगीर परिसरात पावसाची रिमझिम सुरु आहे.
मीरा-भाईंदरमध्ये पावसाची रिपरिप सुरू
मीरा-भाईंदरमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काल दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शहरात कुठेही पाणी साचले नसून, वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. सततच्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईसाठी यलो अलर्ट जारी
हवामान विभागाने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, तर उद्या आणि परवा अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज आहे. मंत्रालय आणि हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील ३ तासांत मुंबई आणि मुंबई उपनगरातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि स्थानिक शासकीय यंत्रणांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २३ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासूनच जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यात काजळी नदीचाही समावेश आहे. तसेच नागपूरसह विदर्भातही आजपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २१ ते २३ जुलैदरम्यान विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात आठ ते दहा दिवसांची प्रतीक्षा संपवून पाऊस पुन्हा बरसणार असल्याने खरीप पिकांना दिलासा मिळून शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे.
