मुंबईत पावसाची पुन्हा तुफान बॅटिंग, मध्य रेल्वेचा खोळंबा; लोकलची स्थिती काय?
गेले दोन दिवस विश्रांतीनंतर, मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, तर रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. भायखळा स्टेशनवर पाण्याची गळती होत असल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत.

गेले दोन दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन ते चार तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासूनच पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टला मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल असा अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसारच पावसाची दमदार हजेरी लागल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईत घाटकोपर, सायन, चेंबूर यांसारख्या अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. सध्या आकाशात काळ्या ढगांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भर दिवसाही अंधारमय वातावरण पाहायला मिळत आहे. जर हा पाऊस असाच सुरू राहिला, तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणी येत आहेत.
मुंबईतील पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स-हार्बर लाईनवरील लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत. तर ठाणे-कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकल ५ ते १० मिनिटं उशिराने धावत आहेत. त्याचप्रमाणे, पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार-चर्चगेट आणि ट्रान्स-हार्बर लाईनवरील वाशी-सीएसएमटी मार्गावरील लोकल गाड्याही ५ ते ७ मिनिटं उशिराने धावत आहेत. तांत्रिक कारणांमुळे ही रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
वाहतुकीवर परिणाम
मुंबईतील कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, वांद्रे आणि सायन परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. मात्र, पश्चिम द्रुतगती महामार्गावर सध्या वाहतूक सुरळीत असून वाहने वेगाने धावत आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भायखळा स्टेशनवर प्रवाशांची दैना
पावसामुळे भायखळा रेल्वे स्थानकात प्रवाशांचे हाल होत आहेत. स्टेशनच्या ३ व ४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर स्कायवॉकच्या पत्र्याला गळती लागली आहे. त्यामुळे धबधबा कोसळल्यासारखे वाटत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातही छत्री उघडून बसावं लागत आहे. यामुळे तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग वाढली आहे. मुंबईतील कुर्ला एसटी डेपोमध्ये कोकण तसेच पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची काल रात्रीपासूनच मोठी गर्दी झाली आहे. गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस बाकी असल्याने गावी पोहोचण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू आहे.
