APMC मार्केट आज पुन्हा बंद, माथाडी कामगारांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आंदोलनाची घोषणा केली आहे. माथाडी कामगारांसाठी कुणालाही वेळ नाही. त्यामुळे आता हे आंदोलन उभा महाराष्ट्र पाहणार, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

APMC मार्केट आज पुन्हा बंद, माथाडी कामगारांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन


मुंबई: राज्यातील APMC मार्केट आज पुन्हा बंद राहण्याची शक्यता आहे. कारण, माथाडी कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करणार आहेत. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी तशी माहिती दिली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील APMC मार्केट बंद राहण्याची शक्यता आहे. (Statewide agitation of Mathadi workers today)

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आंदोलनाची घोषणा केली आहे. माथाडी कामगारांसाठी कुणालाही वेळ नाही. त्यामुळे आता हे आंदोलन उभा महाराष्ट्र पाहणार, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

कोल्हापूर

राज्यव्यापी आंदोलनात कोल्हापुरातील माथाडी कामगारही सहभागी झाले आहेत. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा आणि बटाटा सौदे आज बंद राहणार आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे सौदे बंद ठेवण्यात आले आहेत. बाजार समितीमधील अन्य व्यवहार मात्र सुरुळीत आहेत.

पुणे

दुसरीकडे पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील व्यवहार मात्र सुरुळीत आहेत. नरेंद्र पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात अन्य माथाडी कामगार संघटना सहभागी नसल्याचं त्यावरुन दिसून येत आहे. पुण्यातील बाजारपेठेत भाजीपाल्याची मोठी आवक झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु आहेत. मात्र, कांदा विभागातील युनियनचे काही कर्मचारी मात्र संपात सहभागी झाले आहेत.

नाशिक

नाशिक बाजार समितीही आज बंद राहणार आहे. माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपात नाशिक जिल्ह्यातील जवळपास 14 मुख्य आणि 2 उपबाजार समित्या बंद राहणार आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर बेमुदत बंदचाही इशारा देण्यात आला आहे. नाशिकची कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

लासलगाव

माथाडी हमाल आणि मापारी कामगारांकडून एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा आणि धान्य लिलाव बंद आहेत. 14 विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी हा संप पुकारल्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमधील 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल आज ठप्प राहणार आहे.

मनमाड

आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी आज संप पुकारला आहे. या संपात मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा बाजार समित्याही या संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळं आज बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसत आहे.

काय आहेत माथाडी कामगारांच्या मागण्या?

1. माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून कोरोनामुळे मृत झालेल्या कामगारांना आर्थिक नुकसान भरपाई देणे

2. माथाडी कामगारांना कामावर ये जा करण्यासाठी रेल्वे पास तिकीट देणे

3. माथाडी कामगारांच्या कामात शिरकाव केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीना आळा घालणे

4. राष्ट्रीयकृत बँका किंवा पतपेढी कडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची माथाडी बोर्डाकडून कपात न होण्याबाबत कामगार विभागाने काढलेला 5 मार्च 2019 आदेश रद्द करणे

5. कांदा बटाटा , भाजी पाला, फळे मालावरील नियमण कायम करणे

6. मार्केट आवारातील मालाची आवक होऊन पुरेसे काम मिळण्याबद्दल उपाययोजना होणे

7. नाशिक येथील माथाडी कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नांची सोडवणूक होणे

8. मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे

9. विविध माथाडी मंडळावर पूर्णवेळ चेअरमन, सेक्रेटरी यांची नेमणूक करणे

10. माथाडी ऍक्ट 1969 अनव्य स्थापन झालेल्या सल्लागार समितीची पुनर्रचना करणे व संस्थापक संघटनेच्या प्रतिनिधी ची सदस्य म्हणून नेमणूक करणे

संबंधित बातम्या:

सुरक्षा रक्षकांसह माथाडी कामगारांना 50 लाखांचे विमा संरक्षण, अत्यावश्यक सेवेत समावेश, अजित पवारांची घोषणा

Statewide agitation of Mathadi workers today

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI