आता तुमचा दुपारचा डबाही महागला, मुंबईच्या डबेवाल्यांकडून दरवाढ जाहीर, किती पैसे मोजावे लागणार?
मुंबईतील डबेवाल्यांनी वाढत्या महागाई आणि इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर डब्याच्या मासिक दरात २०० रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू झाली आहे. पाच किलोमीटरच्या आत डबा पोहोचवण्याचे शुल्क आता १४०० रुपये झाले आहे, तर त्याहून जास्त अंतरासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. डबेवाल्यांनी पांडुरंगाच्या वारीसाठी ७ जुलै रोजी एक दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

सध्या महागाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी बेस्ट बस आणि रिक्षाची दरवाढ करण्यात आली. त्यातच आता मुंबईच्या नोकरदार मंडळींना दुपारचे जेवण वेळेवर पोहोचवणारे आणि त्यांच्या वक्तशीरपणासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले मुंबईचे डबेवाल्यांची सेवा आता महागली आहे. मुंबईचे डबेवाले आता आपली सेवा अधिक दराने देणार आहेत. प्रत्येक डब्याच्या मागे मासिक शुल्कात 200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ याच महिन्यापासून लागू झाली आहे.
मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील डबेवाल्यांनी प्रत्येक डब्यामागे मासिक शुल्कात २०० रुपयांची वाढ केली आहे. वाढती महागाई आणि प्रवासातील वाढती जोखीम या दोन प्रमुख कारणांमुळे हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. डबेवाले हे नेहमीच त्यांच्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे इतके वर्ष ते ग्राहकांचा विश्वास जपत आहेत. त्यांनी आतापर्यंत अखंड सेवा दिली आहे. मात्र, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सेवा शुल्क वाढवणे आवश्यक बनले होते.
कशी असणार दरवाढ?
या दरवाढीमुळे, आता डबा घेण्याच्या ठिकाणापासून ते कार्यालय पाच किलोमीटर अंतरावर असल्यास, जुन्या दरानुसार आकारले जाणारे मासिक शुल्क 1200 होते. आता ते वाढून 1400 रुपये करण्यात आले आहे. तर पाच किलोमीटरच्या पुढे सेवा द्यायची असल्यास, डबेवाल्यांच्या आवश्यकतेनुसार पूर्वीप्रमाणेच प्रत्येकी 300 ते 400 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.
मुंबईतील डबेवाल्यांची सेवा ही केवळ एक व्यवसाय नसून, ती मुंबईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या या दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात थोडा फरक पडू शकतो. परंतु डबेवाल्यांच्या कामाचे महत्त्व आणि निष्ठा लक्षात घेता, या निर्णयाला समजून घेतले जाण्याची शक्यता आहे.
७ जुलैला मुंबईत डबेसेवा बंद
दरम्यान पांडुरंगाचे दर्शन घेण्याची आस मुंबईच्या डबेवाल्यांना लागली आहे. डबेवाला कामगार मुंबईत जरी काम करत असला तरी त्याची वारी कधी चुकली नाही. वारीला जाण्यासाठी डबेवाला कामगारांनी एक दिवसांची रजा जाहीर केली आहे. त्यामुळे ७ जुलैला मुंबईत डबेसेवा बंद असणार आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनने अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. ५ जुलै रोजी दिवसभर डबेवाले काम करतील आणि रात्री वाहनाने पंढरपूरला रवाना होतील. ६ जुलै रविवार व एकादशीची शासकीय सुट्टी आहे, त्यादिवशी डबेवाले पांडुरंगाचे दर्शन घेतील. सोमवार, ७ जुलै सोमवार द्वादशीचा उपवास पंढरपुरात सोडतील व ते मुंबईला रवाना होतील. ८ जुलै मंगळवार डबेवाले नेहमीप्रमाणे कामावर हजर होतील, असे सुभाष तळेकर यांनी म्हटले.
