टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, मुंबईसह 13 ठिकाणी छापेमारी, अनेक पुरावे जप्त
टोरेस घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करताना ईडीने गुरुवारी मुंबई आणि जयपूरमध्ये 13 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात मुंबईतील १० आणि जयपूरमधील तीन ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.

मुंबईतील दादर परिसरातील टोरेस कंपनीने लाखो मुंबईकरांना गंडवल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. टोरेस कंपनीच्या फसवणुकीप्रकरणी सध्या पोलीस चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. आता या फसवणूक प्रकरणी प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने मोठी कारवाई केली आहे. टोरेस घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करताना ईडीने गुरुवारी मुंबई आणि जयपूरमध्ये 13 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात मुंबईतील १० आणि जयपूरमधील तीन ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे.
टोरेस कंपनीने एक लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांची फसणवूक केली असून तब्बल १००० कोटींची ही फसवणूक असल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने नऊ विदेशी आरोपींविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. यात आठ युक्रेनचे आणि एक तुर्की नागरिकाचा समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर 200 कोटी रुपये विदेशात पाठवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे.
याप्रकरणी ईडीने गुरुवारी सकाळपासून मुंबईतील 10 आणि जयपूरमधील 3 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी सुरू केली. मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी टोरेस कंपनीच्या अनेक शाखांमध्ये छापेमारी केली आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुल संचलनालयाने (ईडी) मोठ्या प्रमाणात संशयित कागदपत्रे, डिजीटल पुरावे जप्त केले आहेत. ईडीने मे. प्लॅटिनम हेर्न प्रा. लि. (टोरेस ज्वेलरी) आणि त्याच्या सहयोगी संस्थांच्या नावावर असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्यात २१ कोटी ७५ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईडीने याप्रकरणी मुंबई आणि जयपूर येथील 13 ठिकाणी गुरुवारी छापे टाकले होते.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची सातत्याने चर्चा होत होती. टोरेस ही विदेशी कंपनी होती. ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असते. मात्र, हे दागिने बनावट होते. गेल्यावर्षी या कंपनीने मुंबईतील दादर परिसरात पहिले कार्यालय सुरु केले होते. यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांची चेन तयार झाली होती. या कंपनीत गुंतवलेल्या रक्कमेवर 6 टक्क्यांपासून 11 टक्क्यांपर्यंत व्याज दिला जात होता. फक्त सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळेल, असे अमिष दाखवत अनेक लोकांकडून पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले.
टोरेस कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या 4000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा देत असे. सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी 6 टक्के व्याज देत होती. तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 11 टक्के व्याज मिळत होते. सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला होता. त्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले. मात्र टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला.