‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे : नवाब मलिक

| Updated on: Jul 12, 2021 | 7:46 PM

'दाढीवाला चोर कोण' त्याचं नांव काय हे आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.

दाढीवाला चोर कोण त्याचं नांव आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे : नवाब मलिक
नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई : शरद पवार यांनी काल (11जुलै) भाष्य केल्यानंतर ‘चोर के दाढीमे तिनका’ असं वक्तव्य भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार यांनी केलं. मात्र, ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव काय हे आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. ते मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

विशेष म्हणजे यापुढे दर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. आज या पत्रकार परिषदेची सुरूवात झाली. पहिल्याच पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजपला निशाण्यावर घेत जोरदार फटकेबाजी केली.

योगी आदित्यनाथ यांची ‘दोन मुलांची’ पॉलिसी असेल किंवा अमित शहा यांच्या सहकार खात्याबद्दल भाजपकडून देण्यात येत असलेल्या धमक्या असतील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरही नवाब मलिक यांनी भाष्य करत सबुरीचा सल्ला दिला.

नवाब मलिक म्हणाले, “शरद पवार यांनी 2013 साली युपीए सरकारच्या काळात सहकाराला घटनात्मक सुचित टाकून स्वायत्तता देण्याचे काम केले. परंतु या स्वायत्ततेवर कोण गदा आणत असेल, तर त्यावर नंतर बोलू. मात्र कायद्याचं राज्य असतं. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. एखादा व्यक्ती मंत्री झाला म्हणून सर्व अधिकार मिळतात असं नाही. त्यामुळे भाजपच्या लोकांनी जबाबदारीने बोलावं.”

“योगींनी दोन मुलांचे धोरण आणण्याऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणावे…”

“उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार ‘दोन मुलांचे’ धोरण आणत आहे. हे धोरण महाराष्ट्रात 2000 मध्येच तयार करण्यात आलेले आहे. मात्र योगी आदित्यनाथ ‘दोन मुले’ हे धोरण आणून संपूर्ण देशात गोंधळ घालत आहेत. त्यांनी दोन मुलांऐवजी भाजप नेत्यांच्या वक्तव्यानुसार जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे,” असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.

नवाब मलिक म्हणाले, “दोन मुलांच्यावर मुल झालं तर त्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा शासकीय लाभ घेता येत नाही हे महाराष्ट्रात धोरण ठरलेले आहे. भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत त्यांची मुलं नाहीत. किंवा भाजपची मातृसंस्था आरएसएसमध्येसुध्दा असे लोक आहेत ज्यांना मुलंच नाहीत. दोन मुलं ही पॉलिसी बर्‍याच राज्यात आहे. त्यामुळे योगींनी ‘मुलं नकोत’ ही पॉलिसी अंमलात आणली पाहिजे कारण मुलं नाहीत त्यांना प्रोत्साहन मिळेल.”

“भाजपचे साक्षी महाराज असतील किंवा त्यांच्यासारखे अनेक लोक आहेत. जे जास्त मुलं जन्माला घाला अशी सारखी – सारखी वक्तव्य करत आहेत. त्यांचं ऐकून योगीजींनी पॉलिसी निर्माण करावी”, असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला.

“नाना पटोले यांनी माहितीच्या अभावी आरोप केला…”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहितीच्या अभावी आरोप केला आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

नवाब मलिक म्हणाले, “नाना पटोले यांनी त्यांच्या हालचालीवर व कार्यक्रमावर पहारे बसवण्यात आले आहेत. ही माहिती गृहमंत्रालय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पुरवते असा आरोप केला. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी राज्यात सरकार कुणाचेही असो राजकीय कार्यक्रम, आंदोलने, बैठका किंवा महत्त्वाचे नेते, मंत्री त्यांच्या हालचालीची नोंद ठेवण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक असतं. ते सर्व पक्षांची माहिती संकलित करून तो खात्यांतर्गत रिपोर्ट करत असतात आणि संकलित माहिती गृहखात्याकडे जमा होते.”

“ही सिस्टम नाना पटोले यांना माहीत नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चौहान यांच्याकडून माहिती करून घेतली पाहिजे. जर नाना पटोले यांना वाटत असेल की, त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस नको, त्यांच्या नेत्यांना, मंत्र्यांना पोलीस बंदोबस्त नको तर तसा अर्ज केला तर त्याबाबतीत गृहमंत्री काय तो निर्णय घेतील,” असेही नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा :

नानांची भूमिका मविआला सुरुंग लावणारी, अजित पवार संतापले, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

आधी माहिती घ्या, मग आरोप करा, नाना पटोलेंवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं भागभांडवल 700 कोटी होणार : नवाब मलिक

व्हिडीओ पाहा :

Nawab Malik criticize Ashish Shelar over statement on Sharad Pawar