नानांची भूमिका मविआला सुरुंग लावणारी, अजित पवार संतापले, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे व्यक्त केली.

नानांची भूमिका मविआला सुरुंग लावणारी, अजित पवार संतापले, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले आहेत. नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे व्यक्त केली. नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर केला होता. त्यानंतर अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती टीव्ही 9 मराठीला दिली.

अजित पवारांची नाराजी 

महाविकास आघाडीला सुरुंग लावला जातोय, असं अजित पवार म्हणाले. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नाना पटोलेंची भूमिका मविआला कमकुवत करण्याची आहे. मविआला अडचणीत आणणारी आहे, असं अजित पवारांचं म्हणणं आहे.

नाना पटोलेंच्या या भूमिकेबाबत मविआचे नेते काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. नाना पटोलेंच्या आरोपानंतर अजित पवारांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली नाराजी बोलून दाखवली.

नवाब मलिकांचा हल्लाबोल 

नाना पटोलेंच्या या आरोपांना नवाब मलिक यांनी उत्तर दिलं. मलिक म्हणाले, “नाना पटोले यांनी जे‌ आरोप केलेत‌ ते त्यांनी माहितीच्या अभावानं हे आरोप केले आहेत‌. कुठलंही सरकार असेल तरी अशा पद्धतीनं माहिती गृहखातं संकलित करत असतं. सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष असते. हे आताच होतंय असं नाही. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होतं. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी. त्यांनी माहिती न घेतल्याने असे आरोप करत आहेत”, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.

नाना पटोले काय म्हणाले होते? 

नाना पटोले म्हणाले, “त्यांच्याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रिपद आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. कुठे कुठे काय चालू आहे, आंदोलन कुठे काय चालू आहे, हे सगळं त्यांना अपडेट द्यावे लागतात. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे त्यांना माहीत नाही का? ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्न करणार”

संबंधित बातम्या  

आधी माहिती घ्या, मग आरोप करा, नाना पटोलेंवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, माझ्यावर पाळत ठेवली जातेय, नाना पटोलेंचे गंभीर आरोप

नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू?; शरद पवारांनी फटकारले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI