नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू?; शरद पवारांनी फटकारले

नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू?; शरद पवारांनी फटकारले
sharad pawar

महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिला. (Nana patole)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 11, 2021 | 4:08 PM

पुणे: महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिला. नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही पवारांनी त्यांना अनुलेखाने टाळण्याचा प्रयत्न केल्याने उलटसुलट चर्चांना वेग आला आहे.

शरद पवार यांनी बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी पटोले यांना थेट त्यांची जागाच दाखवली. या गोष्टीत मी काही पडत नाहीत. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं, असं पवार म्हणाले. पवारांच्या या खोचक टीकेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

पहिल्यांदाच टीका

महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आधीपासून धुसफूस आहे. निधी वाटपापासून ते राष्ट्रवादीलाच सन्मान मिळत असल्यापर्यंतच्या विविध कारणामुळे महाविकास आघाडीत ठिणग्या उडाल्या. शिवाय स्वबळाचा नारा देण्यावरूनही महाविकास आघाडीत तू तू मै मै आहे. मात्र, अद्यापपर्यंत आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी कुणाही विरोधात वैयक्तिक नाव घेऊन टीका केली नव्हती. मात्र, दोन वर्षात पहिल्यांदाच शरद पवार यांनी थेट पटोलेंवर टीका करत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. पटोलेंच्या विधानाला आपण किंमत देत नसल्याचंही पवारांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. आघाडीत सर्वकाही अलबेल नसल्याचंही या निमित्ताने अधोरेखित झालं आहे. महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, असं विधानही त्यांनी केलं होतं.

पटोले काय म्हणाले होते?

पटोले लोणावळ्यात होते. एका मेळाव्याला संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपतं, असं सांगतानाच आपण काहीच बोलायचं नाही. पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर लढायचं म्हणालो. यावर माघार घेणार नाही. त्यामुळे कामाला लागा, असं पटोले म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

कोकणात शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे ‘मनोमिलन’; विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ

कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र पंकजा मुंडेंच्याविरोधात जाऊ शकतं का?; वाचा सविस्तर

Maharashtra News LIVE Update | मुंडे भगिनींच्या समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच, पाथर्डी तालुका भाजपा कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें