मग जावयाला ड्रग्जप्रकरणात अटक झाल्याने तुम्हीही राजीनामा द्या; दरेकरांचं नवाब मलिक यांना थेट आव्हान

तुमच्या जावयाला ड्रग्ज तस्करी प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. मग आता आपणही राजीनामा द्यावा किंवा सरकारने नवाब मलिकांचे मंत्री पद काढून घ्यावे, असं ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे. (nawab malik should resign as a minister, pravin darekar demand)

मग जावयाला ड्रग्जप्रकरणात अटक झाल्याने तुम्हीही राजीनामा द्या; दरेकरांचं नवाब मलिक यांना थेट आव्हान
pravin darekar

मुंबई: लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. असं असेल तर मलिक यांच्या जावयालाही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. मग मलिक यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे थेट आव्हानच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिलं आहे.

प्रविण दरेकर यांनी ट्विट करून थेट नवाब मलिक यांनाच आव्हान दिलं आहे. तुमच्या जावयाला ड्रग्ज तस्करी प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. मग आता आपणही राजीनामा द्यावा किंवा सरकारने नवाब मलिकांचे मंत्री पद काढून घ्यावे, असं ट्विट दरेकर यांनी केलं आहे.

तेव्हा संवेदना कुठे होत्या?

लखीमपूरच्या घटनेचं राजकारण केलं जात आहे. ही घटना दुर्देवी आहे. त्याचा निषेध करतो. या प्रकरणी कारवाई होत आहे आणि ती झालीच पाहिजे. पण मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा तुमच्या संवेदना कुठे होत्या? पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड झाले तेव्हाही तुमच्या संवेदना कुठे होत्या? गोवारी हत्याकांडाच्यावेळी निषेध का केला नाही? असा सवालही त्यांनी केला. सरकार बंद यशस्वी करण्यासाठी दुरुपयोग करत आहे. सरकारच्या अख्त्यारीत सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दमबाजी करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

मलिक काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आणि आज मीडियाशी संवाद साधताना मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. उद्याच्या बंदमध्ये जनता सहभागी होईल आणि केंद्राच्या जुल्मी कारवाईचा निषेध करेल. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. मात्र, संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठी उभा आहे, असं सांगतानाच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा या प्रकरणात हात असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने त्यानंतर मिश्रा यांच्या मुलाला अटक झाली. गृहराज्यमंत्र्यांच्या गावात ही घटना घडली. त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले. त्यामुळे मिश्रा यांनी राजीनामा दिला पाहिजे. केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं मलिक म्हणाले होते.

क्रुझवरील कारवाई हा फर्जीवाडाच

यावेळी त्यांनी एनसीबीचे अधिकारी ग्यानेश्वर सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही काही प्रश्न उपस्थित केले. माझा मुद्दा हा आहे की 11 लोकं होती आणि एनसीबीने 3 लोकांना सोडलं. एनसीबी म्हणतेय 11 नाही, 14 लोकं होते. या सर्वांना रात्रभर एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. आम्ही सर्व फुटेज पाहिले. 13 लोक आहेत. 3 लोकं सोडल्यावर आम्ही हे फुटेज जाहीर केलं. आणखी तीन लोकांना सोडण्यात आले आहे. ते लोक कोण होते? त्यांची फुटेज जाहीर करा, असं आम्ही एनसीबीला आव्हान करतो. तुमच्या कार्यालयातून बाहेर पडतानाचे फुटेज जाहीर करा. भाजप नेत्यांच्या बोलण्यावर तीन लोकांना सोडण्यात आलं आहे. ही सर्व कारवाई हे फर्जीवाडा आहे, असा दावाही त्यांनी केला होता.

 

संबंधित बातम्या:

रेल्वेतील सुरक्षा वाढवा, सीसीटीव्ही बसवा, पुष्पक एक्स्प्रेस बलात्कार प्रकरणानंतर नीलम गोऱ्हेंचे गृहमंत्र्यांना पत्र

अनिल देशमुखांवर पुन्हा छापेमारी, आता मुलगा सलीलविरोधात अटक वॉरंट जारी : सूत्र

Maharashtra Band : ठाण्यात उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण! व्हिडीओ उजेडात

(nawab malik should resign as a minister, pravin darekar demand)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI