माझा अनिल देशमुख करण्याचा केंद्रीय यंत्रणांचा डाव, अमित शहांकडे तक्रार करणार; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात आले. माझ्याविरोधातही त्याच पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा खोटी माहिती देवून मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

माझा अनिल देशमुख करण्याचा केंद्रीय यंत्रणांचा डाव, अमित शहांकडे तक्रार करणार; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
ncp leader nawab malik

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात आले. माझ्याविरोधातही त्याच पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा खोटी माहिती देवून मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप करतानाच या प्रकरणाची मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे लवकरच तक्रार करणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट केंद्रीय तपास यंत्रणांवरच हल्ला चढवला. मात्र, नेमकी कोणती केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्याविरोधात षडयंत्र रचत आहे हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. अनिल देशमुखांशी जो खेळ खेळण्यात आला. तोच खेळ माझ्यासोबत खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याची माहिती मला मिळाली आहे. पुरावे आले आहेत. माझ्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली आहे. मी त्याचीही माहिती मुंबई पोलीस आयुक्तांना देणार आहे, असं मलिक म्हणाले.

चॅटचे पुरावे पोलिसांना देणार

खोटी तक्रार करून देशमुखांविरोधात कारवाई झाली. मलाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचे माझ्या हातात पुरावे आले आहेत. केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी माझ्याविरोधात मसुदा तयार करून व्हॉट्सअॅपवर पाठवत आहेत. काही लोकांना माझ्याविरोधातील मजुकराचा ईमेल करत आहे. या माहितीच्या आधारे खोटी तक्रार करत आहेत. मला अडकवण्याचा डाव केंद्रीय यंत्रणा करत आहे. ते सहन करणार नाही. त्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असून केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावेही पोलिसांना देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

मला फ्रेम करण्याचा डाव

या प्रकरणाची मी अमित शहांकडे तक्रार करणार आहे. शहा यांना पत्रं लिहून तक्रार करणार आहे. मला अडकवण्याचा डाव करणार असाल तर मी घाबरणार नाही. या संपूर्ण प्रकरणावर शहा काय कारवाई करतात हे पाहणार आहे. तसेच माझ्याविरोधात कुठे कुठे आणि किती तक्रारी करण्यात आल्या त्याची आरटीआयमधून माहिती घेणार आहे. राज्याच्या मंत्र्यांना फ्रेम करण्याचा हा मोठा डाव आहे. एक अनिल देशमुख झाले, आता मला फ्रेम करून दुसरे देशमुख करण्याचा डाव आहे, असा दावा त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

दोन महिन्यांपासून माझ्यावर, माझ्या नातवांवरही पाळत, हेरगिरी करणाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करणार: नवाब मलिक

माहीम किल्ल्या नंतर, BMC वरळी किल्ल्याच्या सुशोभिकरण करणार, 2 कोटींचा प्रकल्प घेतला हाती

भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार

Published On - 10:36 am, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI