
Shinde Shivsena V/s BJP: मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे वक्तव्य करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे सूतोवाच केले होते. त्यांनी या वक्तव्यानंतर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. तर भाजपच्या नेत्यांनी त्यांचे वक्तव्य त्या अर्थाने नव्हते अशी सारवासारव केली. महायुतीत पक्ष वाढीवरून वाद उफळल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीतच या दोन्ही पक्षातील वरिष्ठ एकमेकांवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. तर आता रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सभेत अजून एक जहरी बाण सोडला आहे.
विटा नगरपरिषदेच्या प्रचार सभेतील रवींद्र चव्हाण यांचे भाषण गाजले. सांगली जिल्ह्याचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची त्यांना हटकून आठवण आली. 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर आर. आर. पाटील यांनी विधानसभेत भाषण केले होते. ते भाषण अत्यंत गाजले. या भाषणाचा उल्लेख करत रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अजून एक भीमटोला लगावला आहे. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी नगरपालिका, परिषदांच्या तोफा थंडावल्यावर जो निकाल येईल, त्यापूर्वी महायुतीत मोठं वादळ येणार का? याची चर्चा होत आहे.
नंबर दोनला काहीच किंमत नसते
रवींद्र चव्हाण यांनी आर आर आबांच्या भाषणाचा उल्लेख कालच्या विटातील सभेत केला. आर. आर. पाटील त्यावेळी म्हणाले होते की, ‘मी काँग्रेस, राष्ट्रवादी या आघडीत बरीच वर्ष काम केले. मोठी पदं भुषवली. मी नंबर एक होण्याचा प्रयत्न केला. पण नंबर एक होऊ शकलो नाही. तर नंबर दोनच राहिलो. बाबांनो, नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोन याला काही किंमत नसते.’
रवींद्र चव्हाण यांनी आबांच्या या ओळी नेमक्या आठवल्या. ते म्हणाले हे माझं वाक्य नाही, तर आर. आर. आबांचं आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मला एकच सांगायचं आहे की निदान आबांच्या भाषणावर तरी विश्वास ठेवा. दोन नंबरला काहीही किंमत नसते. जो भी कुछ है देवाभाऊ ही है, असे चव्हाण म्हणाले. त्यामुळे त्यांचा हा टोला पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच असल्याचा तर्क लावण्यात येत आहे. कोकणासह राज्यातील अनेक भागात शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजपवर पैसे वाटपाचे गंभीर आरोप केले आहेत. तर शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवारच भाजपमध्ये गेल्याने शिंदे सेना आक्रमक झाली आहे. याविषयी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोलले गेले. त्यांनी मध्यंतरी दिल्लीवारी करत अमित शहा यांची भेटही घेतली. पण नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी महायुतीतच लाथाळ्या सुरु असल्याचे नेत्यांच्या वक्तव्यावरुन समोर येत आहे.