दिल्लीत ऑपरेशन टायगर, डिनर डिप्लोमसीतून शिंदे गटाचं उद्धव सेनेला खिंडार? श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यावर ठाकरेंचे खासदार

Operation Tiger in Delhi : 'ऑपरेशन टायगर' ने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची चाहुल लागली आहे. उद्धव सेनेला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मंत्री उदय सामंत यांनी तर उद्धव सेनेचे खासदार, आमदार शिंदे गटात येणार असल्याचे दावोस दौऱ्यातच सांगितले होते.

दिल्लीत ऑपरेशन टायगर, डिनर डिप्लोमसीतून शिंदे गटाचं उद्धव सेनेला खिंडार? श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यावर ठाकरेंचे खासदार
ऑपरेशन टायगरची चर्चा
| Updated on: Feb 13, 2025 | 12:02 PM

‘ऑपरेशन टायगर’ ने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची चाहुल लागली आहे. एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी आणि मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव सेनेला ‘एक धक्का और दो’ चा नारा बुलंद करण्यात आला आहे. माजी आमदार राजन साळवी हे आज शिंदे गोटात येणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीतून उद्धव सेनेला दोन दिवसांपासून वाईट बातम्यांचे खलिते मिळत आहेत. अगोदरच एकनाथ शिंदे यांचा सत्कार सोहळा ठाकरे सेनेच्या जिव्हारी लागला असतानाच, आता शिंदेसेनेच्या डिनर डिप्लोमसीने त्यांचा बीपी हाय केला आहे.

उद्धव सेनेत मोठ्या घडामोडी

उद्धव सेनेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदेंच्या सत्कार सोहळ्याचे वादळ शमते न शमते तोच उद्धव सेनेला एकामागून एक धक्के बसत आहेत. अर्थात या सर्व प्रकरणाला राजकारणाचा चष्मा लावला तर बरेच काही संकेत मिळतात. त्यातच राजन साळवे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे अगोदरच थेट मॅसेज पोहचला आहे. आता दिल्लीत ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे.

काल एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचे पडसाद लागलीच महाराष्ट्रात उमटले. विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्याला उद्धव सेनेचे खासदार संजय दिना पाटील हे उपस्थित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नेते आदित्य ठाकरे यांनी सुद्धा संजय दिना पाटील यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. ते कदाचित शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले असतील, असे ते म्हणाले. काही लोक जय महाराष्ट्र करण्याऐवजी जय गुजरात करत आहेत. जे भ्रष्टाचारी आहेत, ते आता भीतीपोटी तिकडे पळत असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता ऑपरेशन टायगरला एक प्रकारे बळकटी मिळत आहे.

दुसरीकडे डिनर डिप्लोमसी

एकीकडे या घडामोडी घडत असतानाच, काल रात्री शिंदे गटाकडून डिनर डिप्लोमसी करण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरच्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांनी उपस्थिती लावली. काल रात्री प्रतापराव जाधव यांच्या घरी सर्वपक्षीय खासदारांना स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.