Mumbai Railway Station Bhojpuri Songs : मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर भोजपुरी गाणी वाजवण्याचा वाद पेटल्यानंतर रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
Mumbai Railway Station Bhojpuri Songs : 12 वर्षांपूर्वी ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा प्रश्न विचारला जायचा. आता ‘महाराष्ट्राला चक्क बिहार-यूपीत नेऊन ठेवलं का?’ असा सवाल विचारला जातोय.

मुंबईत काही रेल्वे स्थानकांवर काल छट पूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. त्यावरुन आज राजकीय वातावरण तापलं आहे. वडाळा आणि हार्बर रेल्वेच्या काही स्थानकांवर ही गाणी वाजवण्यात आली. त्यावर आता रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे. “छटपुजेकरता 3-4 दिवसांत मुंबई ते बिहार, उत्तर प्रदेश प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या महाराष्ट्रातून प्रतिदिन 50 ते 60 हजारांच्या घरात आहे. त्यामुळे अशी सांस्कृतिक गाणी उद्घोषणांच्या दरम्यान वाजवली जात आहेत” असं रेल्वेने स्पष्ट केलय. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांवर भोजपुरी विरुद्ध मराठी गाणी असा नवा वाद उफाळून आलाय. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली. आंबिवली रेल्वे स्थानकातही हाच प्रकार घडला. महाराष्ट्राला बिहार-उत्तर प्रदेशात नेऊन ठेवलाय का? असा प्रश्न विचारला जातोय.
12 वर्षांपूर्वी ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा प्रश्न विचारला जायचा. आता ‘महाराष्ट्राला चक्क बिहार-यूपीत नेऊन ठेवलं का?’ असा सवाल विचारला जातोय. मुंबईत महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. “यूपी, बिहार सुधारलं. मुल शिकायला लागली. दंगलखोर बदलायला लागले. तिकडचे मुख्यमंत्री चांगलं करत आहेत. इथले मुख्यमंत्री यूपी बिहार करायला लागले आहेत. संविधान बदलायचं ते हेच” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
महाराष्ट्राचा बिहार करू नका
“आज केंद्रातून सर्वांना परमिशन येतात. केंद्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि रेल्वे मंत्री यांच्या पलीकडे कोण देणार?” असं किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे. मराठी एकीकरण समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सुद्धा हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्राचा बिहार करू नका, मराठी माणसाचा संयम पाहू नका” असं गोवर्धन देशमुख म्हणाले.
पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालावे
“शहरातील सर्वच चौपाट्या, तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून परवानग्या नको. सार्वजनिक पर्यटन ठिकाणी स्थानिक नागरिकांची गैरसोय थांबवा. बिहारचा हा उत्सव खाजगी ठिकाणी साजरा करावा. पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालावे. मुंबई रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणे लावणाऱ्या रेल्वेचे डोकं ठिकाणावर आहे का?” अशी टीका गोवर्धन देशमुख यांनी केली.
