आता अधिवेशनात हिंदी सक्तीवर चर्चा नको…राज ठाकरे यांचा विरोधकांना सल्ला
राज्य सरकारमधील अनेक व्यक्तींनी हिंदी सक्तीला विरोध केला होता. अगदी अजित पवार यांनीही या गोष्टीला विरोध केला होता. त्यानंतरही सरकारने त्यासंदर्भातील परिपत्रक काढले, असे मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगितले.

राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनात हिंदी सक्तीवर विरोधकांनी चर्चा करु नये. कारण सरकारने हिंदी सक्तीचे परिपत्रक मागे घेतले आहे. महाराष्ट्रात खूप प्रश्न तुंबले आहेत. राज्यात अनेक विषय आहेत. त्यामुळे भाषेवर विषय आणू नका. अधिवेशनात मुलभूत प्रश्नांवर चर्चा करावी. हिंदी सक्तीच्या विषयावर चर्चा करुन वेळ वाया घालवू नये. शिक्षण क्षेत्रात अनेक गंभीर विषय आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये शाळा नाही. काही शाळांमध्ये शिक्षक नाही. कुठे शिक्षकांना पगार नाही. शिक्षणात अनेक त्रुटी आहेत. त्यावर चर्चा करा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी सांगितले.
मेळाव्यात पक्षीय लेबल असणार नाही…
राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीचे परिपत्रक मागे घेतल्यानंतर विजयी मेळावा घेण्यास संमती दर्शवली. ते म्हणाले, विजयी मेळावा ५ जुलै रोजी घेणार आहे. त्यासाठी मी माझ्या लोकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर हा मेळावा कुठे होईल, त्यावर निर्णय करणार आहोत. या मेळाव्यात पक्षीय लेबल असणार नाही. मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, केवळ मराठी हा अजेंडा असणार आहे. हा मेळावा केवळ विजयी मिळावा असणार आहे. युती, आघाड्या सर्व गोष्टी येतील जातील. परंतु हिंदी सक्तीसारखे विषय हे महाराष्ट्रावर संकट असणार आहे.
हिंदी सक्तीची कोणतीही गोष्टी मान्य करणार नाही…
राज्य सरकारमधील अनेक लोकांनी हिंदी सक्तीला विरोध केला होता. अगदी अजित पवार यांनीही या गोष्टीला विरोध केला. त्यानंतरही हिंदी सक्तीचा विषय करण्यात आला. हिंदी सक्तीची कोणतीही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही. हिंदी का हवे? हे मला अजूनही कळत नाही. हिंदी ही एका प्रातांची भाषा आहे. पहिले ते पाचवी हिंदी चालणार नाही. मग कोणाचीही समिती असेल तरी चालणार नाही. महाराष्ट्रात या मुद्याला किती विरोध झाला, त्याची जाणीव नरेंद्र जाधव यांना असायला हवी, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांच्या काळातील हा विषय आहे का? त्याची माहिती मला मिळाली नाही. मराठी माणसाच्या विरोधात कोणीही असेल तरी माझा त्याला विरोध असणार आहे, असे राज ठाकरे यांनी रोखठोकपणे सांगितले. मराठी या विषयावर कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही. महाराष्ट्राचे सर्व बाजूने लचके तोडण्याचा प्रयत्न होत आहे. मराठी व्यक्तीने त्यासाठी जागृत असायला हवे, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.
