शरद पवारसाहेब नजीब मुल्लाला आवरा, खुनाला उत्तर खुनाने योग्य नाही; राज ठाकरे गरजले

मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव आलं आहे. (raj thackeray will meet sharad pawar on jamil shaikh case)

शरद पवारसाहेब नजीब मुल्लाला आवरा, खुनाला उत्तर खुनाने योग्य नाही; राज ठाकरे गरजले
राज ठाकरे_शरद पवार

मुंबई: मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव आलं आहे. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोकच दिवसाढवळ्या लोकांना मारत असले तर हे बरोबर नाही. या प्रकरणात सरकार काय करतेय ते पाहणारच आहे. नाही तर दुसऱ्यांचेही हात बांधलेले नाहीत. खुनाला उत्तर खुनाने देणं हे चित्रं महाराष्ट्रासाठी योग्य राहणार नाही, असा इशारा देतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून नजीब मुल्लावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. (raj thackeray will meet sharad pawar on jamil shaikh case)

राज ठाकरे यांनी कृष्णकुंज निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मनसेचा पक्षाचा पदाधिकारी जमील शेख यांची हत्या झाली. या हत्याप्रकरणाचा उत्तर प्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी कबुली जबाब दिला असून यात ठाण्यातील राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्लाचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे, त्यामध्ये नजीम मुल्लाचं नाव आहे. नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असं या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे. सत्ताधारीची लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लाचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आलं होतं. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय, असं राज म्हणाले.

दुसऱ्यांचेही हात बांधलेले नाहीत

याबाबत शरद पवारांची भेट घेणार आहे. अशी मंडळी यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हातही बांधलेले नसतात. खुनाचे उत्तर खुनाने अशा गोष्टी महाराष्ट्रात सुरु झाल्या तर हे चित्र चांगले दिसणार नाही, नजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी पवारांचे भेट घेणार, असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य की…

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही चिमटा काढला. ते म्हणाले की मला काल एका मित्राने जोक पाठवला. त्यात त्याने उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलं की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय हेच कळत नसल्याचं म्हटलं होतं. आजची परिस्थिती पाहता हा जोक चपखल लागू होतो, असा चिमटाही त्यांनी काढला.

देशमुखांचे बारही बंद

यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांनाही टोला लगावला. राज्यात लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे सर्वच बंद आहे. सर्व म्हणजे सर्व बंद आहे. त्यात रेस्टॉरंट वगैरे आलेच. देशमुखांचे बारही बंद आहेत, असा चिमटा राज यांनी काढताच एकच खसखस पिकली.

परमबीर सिंगाना आताच साक्षात्कार कसा?

राज यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही फैलावर घेतलं. देशमुखांनी 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिलं होतं. याचा साक्षात्कार परमबीर सिंगांना त्यांना पदावरून हटवल्यावरच का झाला? काढलं नसतं तर ते बोलले नसते का?, असा सवाल करतानाच बदल्यांचा बाजार होतच असतो. तो काही आजच होत नाही. अनेकजण मंत्रालयात कान लावून बसलेले असतात, असंही ते म्हणाले. (raj thackeray will meet sharad pawar on jamil shaikh case)

संबंधित बातम्या:

Raj Thackeray PC LIVE : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्रात कोरोना का वाढला?; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं!

‘किंबहुना’ वापरलं तर चालेल ना; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शैलीवर मिश्किल टिप्पणी

(raj thackeray will meet sharad pawar on jamil shaikh case)

Published On - 12:31 pm, Tue, 6 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI