Rohit Pawar : भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का? रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Rohit Pawar on Devendra Fadnavis: शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावरून निशाणा साधला. त्यांनी या दौऱ्यातील सोपास्कार आणि सुरक्षा व्यवस्थेवरून टीका केली आहे.

Rohit Pawar : भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का? रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
रोहित पवार, देवेंद्र फडणवीस
| Updated on: Sep 24, 2026 | 9:07 AM

Rohit Pawar on Devendra Fadnavis:  काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा केला. राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. दरम्यान शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावरून निशाणा साधला. त्यांनी या दौऱ्यातील सोपास्कार आणि सुरक्षा व्यवस्थेवरून टीका केली आहे. रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील पीक परिस्थिती पाहिली. त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी संवाद साधला.

शेतकरी आता शेतात बाँबही पिकवायला लागला का?

मुख्यमंत्री महोदय, भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बाँबही पिकवायला लागला का? म्हणून शेतातही मेटल डिटेक्टर लावण्याची वेळ या सरकारवर आली, असा रोखठोक सवाल आमदार रोहित पवार यांनी केला. देशात प्रथमच असं चित्र महाराष्ट्रात दिसतंय हा बळीराजाचा आणि गरीबांचा अवमान आहे, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री साहेब, डिटेक्ट करायचंच असेल तर आज अडचणीत असलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या भावना डिटेक्ट करा आणि बळीराजाला हेक्टरी ५० हजार रुपये, तर शेतमजुरांना प्रति कुटुंब २५ हजार रुपये मदत द्या, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांवर रोहित पवारांचे टीकास्त्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच स्थानिक नेत्यांनीच अडचणीत आणायचं ठरवलंय की काय अशी शंका येते. दुष्काळाची पाहणी शेतात जाऊन करायची असते, तशी सुरवातीला मुख्यमंत्री महोदयांनी ती केलीही, पण एके ठिकाणी त्यांच्या स्थानिक नेत्यांनी चक्क शेतात टेबल लावून एखाद्या प्रदर्शनात मांडल्याप्रमाणे जळालेलं पीक आणून त्या टेबलवर पाहण्यासाठी ठेवलं. आधी पोलिसांनी शेतात मेटल डिटेक्टर लावलं आणि आता टेबलावर जळालेली पिकं ठेवली. हसावं की रडावं अशा नेत्यांवर? असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

आता शेतकऱ्यांनी पाठवलेला हा व्हिडिओ देखील बघा. यात दुष्काळी दौर्‍यासाठी मुख्यमंत्री साहेब आले खरे पण पोलिस मात्र शेतकर्‍यांनाच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अडवतायेत आणि ‘क्कडक’ खादी घातलेल्यांनाच मात्र लगेच सोडलं जातं. शेतकऱ्यांनी वस्तूस्थिती सांगू नये म्हणून असं अडवलं जातंय का? की हा दौरा शेतकर्‍यांसाठी नाही तर पुढाऱ्यांसाठी आहे? उद्या शेतकरी आणि मजुरांनीही अशीच ‘क्कडक’ भूमिका घेतली तर ते या सरकारला परवडेल का? अशी टीका रोहित पवार यांनी केली.

काय काय केली मागणी?

मागील तीन-चार दिवसांत मी संपूर्ण मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करून शेकडो शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून अनेक गावांमध्ये आजच पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांची भेट घेऊन मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शासनाच्या माध्यमातून करावयाच्या मदत व उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.

काही भागात नुकताच परतीचा थोडा-फार पाऊस झाल्याने काही पिके बाहेरून हिरवी दिसत असली, तरी त्यातून एक मूठभरही उत्पादन होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आणि शेतमजूरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी केली.

मागील वर्षी घोषणा केल्याप्रमाणे १७ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरी पीकविमा मिळणे, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा रखडलेला विमा मिळणे, याशिवाय कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा वेग वाढवून सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कमही तातडीने त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी रोहित पवार यांनी शिष्टमंडळासह केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us