
Sanjay Raut on Eknath Shinde Shivsena : खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी वेगळा सूर आळवल्यानंतर त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत या नेत्यांना फटकारले. संविधान, लोकशाही आणि मुंबई वाचवण्यासाठी काँग्रेसने साथ देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी महायुतीमधील मित्रपक्षांना एक धोक्याचा इशारा पण दिला. अर्थात दोन दिवसांपूर्वी त्यांनी याविषयीचे सूतोवाच केले होते. ऐसा कोई सगा नही जिसे भाजपने ठगा नही असे हिंदीतील वाक्य सांगत त्यांनी महायुतीतील मित्रपक्षांना सार सांगण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा फॉर्म्युला समोर येत आहे. तर या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. यात शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. सोलापूरमध्ये ऑपरेशन लोट्स सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीने तिथली आणीबाणीची परिस्थिती थोपवल्याचा दावा केला आहे. अर्थात अनेक भागात असे शीतयुद्ध सुरू आहे. त्यावरून संजय राऊतांनी अचूक निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप
राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असतं. महाराष्ट्रातील बहुमत हे खरं बहुमत नाही. स्वतः फडणवीसांना शिंदेंचा पक्ष फोडायचा आहे. त्याचवेळा अजित पवारांचाही पक्ष फोडायचा आहे. त्याचे भुगर्भातील धक्के सुरू झाले आहेत. हे लक्षात घ्या. फडणवीसांना स्वयंभू राज्य करायचे आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठी भारतीय जनता पक्षातील फडणवीसांचा गट हे कोणतीही भूमिका घेऊ शकतात.
2029 पर्यंत फडणवीस यांनी आपणच मुख्यमंत्री पदी राहणार असल्याचा दावा केला, त्यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यांच्या स्वप्नांवर फडणवीसांनी पाणी फेरल्याचे ते म्हणाले. फडणवीसांना आपण दिल्लीत पाठवू असे शिंदे म्हणत होते. पण भविष्यात दिल्लीच अस्थिर होणार असल्याचा दावा राऊतांनी केला. मी जे फडणवीस यांना ओळखतो, त्यावरून सांगतो की फडणवीस हे शिंदेंचा बंदोबस्तासाठी समर्थ आहेत, असा चिमटा राऊतांनी शिंदेंना काढला.