Sanjay Raut : ते मनानं एकत्रच…संजय राऊतांनी दिले मोठे संकेत, 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा, महाराष्ट्राचे राजकारण कूस पालटणार?

Raj Thackeray-Udhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 5 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात दोन्ही ठाकरे एकत्र दिसतील. महाराष्ट्रातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल?

Sanjay Raut : ते मनानं एकत्रच...संजय राऊतांनी दिले मोठे संकेत, 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा, महाराष्ट्राचे राजकारण कूस पालटणार?
राजकारण कूस बदलणार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 27, 2025 | 10:26 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदीविरोधातील मोर्चात एकत्र येतील. 5 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे. याविषयीची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दोन ठाकरे एकत्र असल्याने अर्थातच राज्यात मोठी घडामोड घडणार याची ही नांदी आहे. राज्यातील राजकारण पुन्हा एकदा कूस बदलणार असल्याचा व्होरा राजकीय पंडित मांडत आहे. त्यातच राऊतांनी दोन्ही ठाकरे मनाने एकत्रच असल्याचा दावा केल्याने महाराष्ट्रातील राजकारण मोठी कूस बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हिंदी लादण्याचा निर्णयामागे डोके कुणाचे?

आज संजय राऊत यांनी पत्र परिषद घेतली. त्यापूर्वी त्यांनी ट्विट करत दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याचे सूतोवाच केले. तर पत्र परिषदेत दोन्ही भाऊ मनाने एकत्र आल्याचा दावा केला. हिंदीच्या नावाने तिसरी भाषा लादली जात आहे. हे ओझं मुलांना पेलवणार नाही. हे शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. अनेक राज्यातील तज्ज्ञांचं हे मत आहे. आमचा हिंदीला विरोध नाही. पण फक्त महाराष्ट्रात हिंदी लादता येत नाही. गुजरातला यातून वगळलं आहे. मराठी भाषेसाठी विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी यावर काम सुरू केलं आहे. या संस्थांनी राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असेल. सरकार म्हणतंय सादरीकरण देतो. पण याचं नेपथ्यकार कोण आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले, याचा राऊतांनी दाखला दिला आणि हिंदी लादण्याच्या निर्णयामागे डोके कुणाचे असा अप्रत्यक्ष सवाल केला.

5 जुलै रोजी मोर्चा

राज ठाकरे यांनी कडवट भूमिका मांडली, ती भूमिका उद्धव ठाकरे यांनीही मांडली. काल कृती समितीचे दीपक पवार आहेत. ते मराठी भाषेचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ७ तारखेला या समितीने सर्व मराठी भाषिकांना आंदोलनासाठी हाक दिली. मोर्चा काढण्याची त्यांची भूमिका होती. मराठीचा विषय असल्याने, मराठीवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्याने उद्धव ठाकरे यांनी कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमच्या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. आम्ही तुमच्या लढ्यात असू असं उद्धव ठाकरे म्हणाले. हा विषय तिथे संपला. मी तिथे उपस्थित होतो. त्याचवेळी राज ठाकरे यांच्याकडे सरकारचे काही लोक गेले. काही सादरीकरण करण्यासाठी. बहुधा ते सादरीकर राज ठाकरेंना मान्य नसावं. आमची पीसी सुरू असतानाच राज ठाकरे यांनीही एका आंदोलनाची घोषणा केली. मोर्चाची घोषणा केली. ती ६ तारखेला केली. त्याची कल्पना आम्हाला नव्हती, असे राऊत म्हणाले.

आमच्या बैठका झाल्यावर आम्ही बाहेर पडल्यावर मला राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांची भूमिका अशी आहे, उद्धव ठाकरेंनी ७ तारखेला आंदोलन करण्याचं ठरवलं. मी ६ तारखेची घोषणा केली आहे. मराठी माणसांसाठीचे दोन मोर्चे एकत्र निघणं बरं दिसत नाही. एकत्र आंदोलन झालं तर त्याचा अधिक प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल, असं राज ठाकरे म्हणाले. मी म्हटलं ठिक आहे. उद्धव ठाकरेंशी या विषयावर चर्चा करतो. मी पुन्हा मातोश्रीत गेलो. त्यांना राज यांची भूमिका सांगितल्याची माहिती राऊतांनी दिली.

यावर कोणतेही आढेवेढे न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाचं ऐक्य दिसणं महत्त्वाचं आहे. मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे. माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याचं असं काही नाही. आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे. पण आपण ७ तारीख यासाठी ठरवली की ६ तारखेला आषाढी एकादशी आहे. रविवारी. राज्यभरात आषाढीचा उत्सव असतो. आपल्या आंदोलनाला मराठी माणसापर्यंत पोहोचवणं कठिण जाईल. म्हणून ७ तारीख घेतली. एकत्र आंदोलन करणार असू तर काही अडचण नाही. त्यांच्याशी चर्चा करू. ७ तारखेला त्यांनी आमच्या मोर्चात यावं किंवा ५ तारखेला एकत्र आंदोलन करावं, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावर मी परत राज ठाकरेंना फोन केला. त्यांच्याशी चर्चा केली, अशी माहिती राऊतांनी यावेळी दिली.