निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवार 19 जानेवारी रोजी बीकेसी मैदानावर प्रचंड मोठी सभा होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार असून या सभेत विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र, या लोकार्पणापूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. हे प्रकल्प आमच्याच काळातील आहेत. त्यातील काही प्रकल्पांचे उद्घाटनही झाले आहे. परत या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन का होत आहे? भाजपला पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेचं काहीच पडलं नाहीये का? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.