Balasaheb Thackeray Jayanti: मोदी, शहा, फडणवीसांवर बाळासाहेबांनी कुंचल्यातून फटकारे लगावले असते; राऊतांचा घणाघात

| Updated on: Jan 23, 2022 | 12:33 PM

राजकारणातील मॉडल्स गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रं काढणं थांबवलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी, नरसिंह राव आणि सीताराम केसरी हे राजकीय पटलावर आले.

Balasaheb Thackeray Jayanti: मोदी, शहा, फडणवीसांवर बाळासाहेबांनी कुंचल्यातून फटकारे लगावले असते; राऊतांचा घणाघात
sanjay raut
Follow us on

मुंबई: राजकारणातील मॉडल्स गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रं काढणं थांबवलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी, नरसिंह राव आणि सीताराम केसरी हे राजकीय पटलावर आले. त्यावेळी व्यंगचित्रासाठीची ही मॉडेल्स मी मिस केली असं बाळासाहेब म्हणायचे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. अमित शहा आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत… बाळासाहेब असते तर यांच्यावर त्यांनी हातात कुंचला घेऊन नक्कीच फटकारे लगावले असते, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. बाळासाहेबांनी कुंचला हाती ठेवला तेव्हा त्यांच्या हाताला त्रास व्हायचा. एकेकाळी मी कुंचला हाती घेतला की अनेकजण थरथरायचे. आज माझे हात थरथर थरत आहेत. प्रेरणा देणारे मॉडल्स मला आता दिसत नाहीत असं ते म्हणायचे. चर्चिल, नेहरू, जॉर्ज फर्नांडिस, सरदार पटेल, इंदिरा गांधी, गुलजारीलाल नंदा, मोरारजी देसाई, एसके पाटील ही सर्व मोठी माणसं देशाच्या राजकारणात होती. व्यंगचित्रं काढताना ही बाळासाहेबांची मॉडेल्स होती. ही लोकं गेल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली. त्यामुळे बाळासाहेबांना चित्रं काढायला त्यांच्याकडे मॉडल्स नव्हती. पण अचानक राजकारणात सोनिया गांधी आल्या, नरसिंह राव आले, सीताराम केसरी आले तेव्हा ते म्हणाले, अरे रे मी ही मॉडल्स मिस केली. मी व्यंगचित्रं सोडली आणि माझी मॉडल्स परत आली. आजही मोदी आहेत, अमित शहा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत… आता राज्यात आणि देशात गडबड सुरू आहे, बाळासाहेब असते तर त्यांना कुंचला हातात घेऊन स्ट्रोक्स… फटकारे नक्कीच मारावेसे वाटले असते, असं राऊत म्हणाले.

त्यांचा हंटर अवतीभोवती असायचा

यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यावरील बाळासाहेबांच्या प्रभावाचे पदर उलघडले. माझ्या आयुष्यावर त्यांचा फार मोठा प्रभाव आहे. ते नसते तर मी नसतो. त्यांचा आशीर्वाद मला लाभला नसता तर तुम्ही जे कॅमेरा घेऊन गेले अनेक वर्ष माझ्याशी बोलता ते संजय राऊत तुम्हाला कधीच दिसले नसते. त्यांनी माझ्या सारख्या मातीच्या गोळ्याला घडवून आकार दिला. सामनाचा संपादक, शिवसेनेचा नेता म्हणून मला फार तरुण वयात जबाबदारी दिली, शिवसेनेच्या नेतृत्व मंडळात घेतलं. मी 28 वर्षाचा असतानाच सामनाचे संपादक म्हणून त्यांनी माझी निवड केली. त्यांनी मला राज्यसभेत पाठवलं होतं. सतत त्यांनी मला घडवण्याचा प्रयत्न केला. मी बिघडू नये यासाठी त्यांचा हंटर सतत माझ्या अवतीभोवती फिरत होता. ते मनाने खूप मोठे होते. विचारानेही महान होते. सामान्यातील सामान्य माणसाला शूरवीर करण्याची ताकद त्यांच्या सहवासात होती. कितीही खचलेला माणूस असो त्यांच्या सहवासात राहून शूरवीर होत असायचा, असं ते म्हणाले.

बाळासाहेबांचीच शिवसेना राहणार

आजची शिवसेना वेगळी आहे या आरोपाचंही त्यांनी खंडन केलं. शिवसेना वेगळी कशी असेल? आजही बाळासाहेबांची प्रेरणा हाच आमचा ऊर्जा स्त्रोत आहे. पिढी बदलते त्यानुसार संघर्षाची प्रतिकं बदलतात. पण विचार तोच राहतो. बाळासाहेबांची शिवसेना ही बाळासाहेबांचीच राहणार. ती दुसऱ्या कुणाचीच होऊ शकत नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

संबंधित बातम्या:

Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती; राऊतांचा हल्लाबोल

Video | बाळासाहेब ठाकरे यांची आज 96वी जयंती, आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

Balasaheb Thackeray Photo | महाराष्ट्राचा वाघ, मराठी अस्मिता जपणारा झुंजार नेता, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो