Mumbai Temperature : उन्हाळ्याची रखरख सुरू; मुंबईमध्ये 37 अंश तापमानाची नोंद
पुढील तीन महिन्यांत म्हणजेच मार्च ते मे या उन्हाळाच्या कालावधीत पारा विक्रमी वेगाने वाढणार आहे. कोकणासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त नोंद होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकताच वर्तवला आहे.

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागांसह शहरी भागातही उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गेल्या दोन दिवसांचा तापमाना (Temperature)ने विक्रमी पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. सांताक्रूझमध्ये 37.1 अंश इतके या हंगामातील उच्चांकी तापमान नोंदवले गेले. अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने नागरिक प्रचंड हवालदिल झाले आहेत. त्यातच मुंबईतही कमाल तापमाना (Maximum Temperature)ने कहर करून चाकरमान्यांना घामाघूम केले आहे. अगदी सकाळपासूनच पारा उसळी घेऊ लागल्याने अंगाची लाहीलाही वाढली आहे. आज मुंबईत सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही ठिकाणच्या तापमान केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. (Santa Cruz recorded a high of 37.1 degrees this season in mumbai)
उकाड्यात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज
कुलाब्यात कमाल 33.5 अंश तर किमान 22.5 अंश सेल्सिअस अशी तापमानाची नोंद झाली. याचवेळी उपनगरात पार्याने विक्रमी उसळी घेतली. सांताक्रूझमध्ये सरासरीपेक्षा तब्बल 4 अंशांची वाढ होऊन 37.1 अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले. त्यामुळे उपनगरातील चाकरमानी घराबाहेर पडताच चांगलेच घामाघूम झाले. या उकाड्यात आणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. उकाड्यात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही 60 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. गुरुवारी कुलाब्यात 67 टक्क्यांच्या पुढे हवेतील आर्द्रता नोंद झाली. त्यामुळे उकाड्यात मोठी भर पडली आहे.
तीन महिने तापमान सरासरीपेक्षा चढेच राहणार
पुढील तीन महिन्यांत म्हणजेच मार्च ते मे या उन्हाळाच्या कालावधीत पारा विक्रमी वेगाने वाढणार आहे. कोकणासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त नोंद होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकताच वर्तवला आहे. चालू महिन्यात राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचे क्षेत्र
नैऋत्य बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी पुढील 2-3 दिवसांत अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 3 ते 5 मार्च दरम्यान काही राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये तुरळक ठिकाणी ‘मुसळधार’ ते ‘अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 4 मार्च आणि 5 मार्च रोजी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा येथे बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे. (Santa Cruz recorded a high of 37.1 degrees this season in mumbai)
इतर बातम्या
Neil Somaiya: नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन का फेटाळला, मुंबई सत्र न्यायालयानं आदेशात काय म्हटलंय?
मुंबईशी माझं भावनिक नातं, पोलीस आयुक्तपदाची धुरा घेताच संजय पांडेंच मुंबईकरांना पत्र
