Mumbai Court : धक्कादायक, मुंबईच्या कोर्टात महिला वकील हार्ट अटॅकने कोसळली पण CPR देण्याऐवजी व्हिडिओ रेकॉर्डिंग
Mumbai Court : एका केसची प्रत मिळवण्यासंदर्भात मालती पवार या न्यायालयात आल्या होत्या. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्या बार रुममध्ये गेल्या होत्या.मालती ह्दयविकाराच्या झटक्याने कोसळल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या कोणीही त्यांना सीपीआर दिला नाही.

एकाकेस संदर्भात मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात (किल्ला कोर्ट) मध्ये आलेल्या एका महिला वकिलाचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. गुरुवारी ही घटना घडली. मालती रमेश पवार असं या महिला वकिलाचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात हे कोर्ट आहे. वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याने आणि कोर्टात मूलभूत वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे मालती पवार यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पतीने केला आहे. त्या 59 वर्षांच्या होत्या. मालती पवार या फॅमिली कोर्ट, बॉम्बे हायकोर्ट आणि इतर स्थानिक न्यायालयांमध्ये वरिष्ठ वकील आणि मध्यस्थ म्हणून कार्यरत होत्या.
हा सर्व प्रकार किल्ला कोर्टात घडला. धक्कादायक बाब म्हणजे मालती यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर कोर्टातच त्रास सुरु झाला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. मात्र उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवलं नाही. परिणामी कोर्टातच त्यांचा मृत्यू झाला. एका केसची प्रत मिळवण्यासंदर्भात मालती पवार या न्यायालयात आल्या होत्या. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्या बार रुममध्ये गेल्या होत्या.मालती ह्दयविकाराच्या झटक्याने कोसळल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या कोणीही त्यांना सीपीआर दिला नाही. उलट लोक व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते, असा त्यांचे पती रमेश यांचा आरोप आहे.
बार रुममध्ये काय घडलं?
बार रुममध्येच मालती यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
एकही सहकारी तिच्याजवळ नव्हता
“मला आझाद मैदान पोलीस स्टेशनमधून साधारण 6.30 च्या सुमारास फोन आला की, माझ्या पत्नीला कामा रुग्णालयात दाखल केलय. मी तिथे पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झालेला. मी कामा रुग्णालायत पोहोचलो, तेव्हा माझ्या पत्नीचा मृतदेह स्ट्रेचवर होता. बॅग तिच्या शेजारी होती. एकही सहकारी तिच्याजवळ नव्हता” अशी व्यथा रमेश पवार यांनी मांडली. या प्रकारानंतर वकील सुनील पांडे यांनी पत्र लिहून मुंबईच्या सर्व न्यायालयांमध्ये वकिलांसाठी आपत्कालीन वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
