पवार-ठाकरे मैदानात, थोरातही सोबतीला, शेतकरी आंदोलनात सर्वात मोठे चेहरे

कृषी कायदे मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. (Sharad Pawar Aditya Thackeray Balasaheb Thorat)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:41 AM, 25 Jan 2021
पवार-ठाकरे मैदानात, थोरातही सोबतीला, शेतकरी आंदोलनात सर्वात मोठे चेहरे
शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे

मुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. कृषी कायदे मागे घेण्याची मुख्य मागणी त्यांनी केली आहे. या मोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासाठी आजच्या (25 जानेवारी) मोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) सहभागी होणार आहेत. या बड्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे या मोर्चाला विशेष महत्व येणार आहे. या नेत्यांसोबत तिन्ही पक्षांचे कार्यकर्तेसुद्धा मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होतील. (Sharad Pawar, Aditya Thackeray, Balasaheb Thorat will join the Mumbai farmers protest)

आमचे जाहीर समर्थन, मोठ्या संख्येने सहभागी होऊ

केंद्र सरकारने लागून केलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासून प्रखर विरोध केला आहे. या कायद्यांविरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅलीसुद्धा काढली होती. महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने जिल्हावार मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चाला प्रदेश काँग्रेसने जाहीर समर्थन केले आहे. “सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कृषी कायदे बनवले आहेत. या कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरु आहे. मात्र, सरकारला त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ नाही. दिल्लीतील या आंदोलनाला आमचे समर्थन आहे. आम्ही नेते आणि काँग्रेसचे सर्यकर्ते मुंबईच्या मोर्चात सहभागी होणार आहोत,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

शरद पवार 1 वाजता सहभागी होणार

मुंबई येथील आझाद मैदानावर सुरु असलेल्या मोर्चात शरद पवार दुपारी 1 वाजता सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे हे बहुमताच्या जोरावर मंजूर केले आहेत. कोणताही कायदा मंजूर करण्यासाठी योग्य चर्चा होणे गरजेचे असते. मात्र, चर्चा न करताच हे कायदे मंजूर करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची बाजू समजून घेणे गरजेचे होते. पण सरकारने तेही केले नाही. त्यामुळेच हे वादंग माजले आहे,” असे शरद पवार म्हणाले. तसेच यावेळी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेही येणार

आझाद मैदान येथे सुरु असलेल्या मोर्चात आदित्य ठाकरे हेसुद्धा सहभागी होणार आहेत. आंदोलनस्थळी येऊन ते शेतकऱ्यांची भेट घेतील. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरेंना पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर उद्धव ठाकरे हे घटनात्मक पदावार असणारे व्यक्ती आहेत. त्यांनी या मोर्चात सहभागी होऊ नये असे वैयक्तिक मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या 

>>> केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत,

>>> शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा

>>> महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात महात्मा फुले कर्ज माफी योजना स्थगित केली होती. ही योजना पुन्हा सुरू करावी

>>> वनाधिकार खात्याची अंमलबजावणी करण्यात यावी

 

दरम्यान, आझाद मैदानावर हजारो शेतकरी जमले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चानं हे आंदोलन पुकारलं आहे. सुमारे 20 हजार शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. एकूण 21 जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता या मोर्चामध्ये शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे यासारखे बडे नेते मोर्चात सहभागी होणार असल्यामुळे या मोर्चाला विशेष महत्त्व आले आहे.

संबंधित बातम्या :

Farmer Protest : मुंबईत ‘लाल वादळ’ घोंघावणार!, कसा असेल पोलीस बंदोबस्त?

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनत सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!

(Sharad Pawar, Aditya Thackeray, Balasaheb Thorat will join the Mumbai farmers protest)