Sharad Pawar : शरद पवार झेड प्लस सुरक्षा घेणार का? दिल्ली दौऱ्यावरुन सस्पेन्स वाढला, अपडेट तरी काय

Sharad Pawar on Z plus security : शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षेवरुन आता राजकारणाने नवीन वळण घेतले आहे. थोरल्या पवारांनी केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर संशय व्यक्त केलेला आहे. तर याच संदर्भात आढावा बैठकीसाठी शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे ते ही सुरक्षा घेतील का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Sharad Pawar : शरद पवार झेड प्लस सुरक्षा घेणार का? दिल्ली दौऱ्यावरुन सस्पेन्स वाढला, अपडेट तरी काय
Z Plus Security, शरद पवार यांचा निर्णय काय
| Updated on: Aug 29, 2024 | 11:27 AM

शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी दिल्लीत उद्या बैठक होत आहे. निवडणुकीसाठीच्या घडामोडींवर पाळत ठेवण्यासाठीच तर ही झेड प्लस सुरक्षा देण्यात येत नाही ना, अशी शंका पवारांनी यापूर्वी व्यक्त केली होती. अमित शाह, मोहन भागवत आणि शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा केंद्राने निर्णय घेतला होता. त्यानंतर आता या आढावा बैठकीसाठी पवार दिल्लीला तातडीने रवाना झाले आहेत. त्यामुळे ते सुरक्षा व्यवस्था घेणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शरद पवार दिल्लीला रवाना

झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांचा निर्णय काय यावर राज्यात चर्चा सुरु असतानाच आज पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले. उद्या पवारांच्या सुरक्षेबाबत दिल्लीमध्ये रिव्ह्यू मीटिंग, आढावा बैठक पार पडणार आहे. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांची भेट घेऊन सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. अद्याप शरद पवारांनी केंद्राची सुरक्षा घेतलेली नाही,दिल्लीला रवाना होण्यापूर्वी देखील शरद पवारांना महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.

म्हणून मला झेड प्लस सुरक्षा

केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, पवारांच्या सुरक्षेसाठी 55 सशस्त्र CRPF जवानांची तुकडी तैनात असेल. आगामी विधानसभा निवडणूक आणि पवारांना मिळालेल्या धमकीनंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले होते. नवी मुंबई येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद सधत या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केंद्राच्या सुरक्षेवरून शरद पवारांनी कदाचित केंद्राला अचूक माहिती घ्यायची असेल अशी संशय निर्माण करणारे टीका केली होती. पवारांच्या या टीकेनंतर उद्या होणारी बैठक अतिशय महत्त्वाची मानण्यात येत आहे.

आयबीच्या अहवालानंतर सुरक्षा

आयबीने गृहमंत्रालयाला एक अहवाल सादर केला होता. त्याच्या विश्लेषणानंतर अमित शाह, मोहन भागवत आणि शरद पवार यांना गृह खात्याने झेड प्लस सुरक्षा देण्याची धोरण स्वीकारले. 16 ऑगस्ट रोजी याविषयीचे निर्देश जारी करण्यात आले होते. नुकतीच मोहन भागवत यांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. शरद पवार यांनी केंद्रावर या निर्णयानंतर हेरगिरीचा आरोप केला आहे. आज ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्याच्या आढावा बैठकीनंतर पवार झेड प्लस सुरक्षा स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.