शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर मोदी सरकारविरुद्ध एकत्र

‘गेट वे ऑफ इंडिया’हून सुरु झालेली गांधी शांती यात्रा अनेक राज्यांतून राजधानी दिल्लीपर्यंत जाणार आहे.

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर मोदी सरकारविरुद्ध एकत्र

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मुंबईत मोदी सरकारविरोधात आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आले. भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात आयोजित ‘गांधी शांती यात्रे’साठी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र (Sharad Pawar Prakash Ambedkar Protests) आल्याचं चित्र दिसलं.

महात्मा गांधी यांच्या विचारावर प्रत्येकाला चालण्याची गरज आहे. नव्या कायद्यामुळे देशाच्या एकात्मतेला धोका असल्याची भीती यावेळी शरद पवारांनी व्यक्त केली. मोदी सरकारने एनआरसी रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी ‘गांधी शांती यात्रा’ काढून केली जाणार आहे.

‘गेट वे ऑफ इंडिया’हून सुरु झालेली गांधी शांती यात्रा अनेक राज्यांतून राजधानी दिल्लीपर्यंत जाणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा मार्गे 30 जानेवारीला महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी राजघाट या स्मृतिस्थळावर यात्रा संपन्न होईल. ‘गेट वे’जवळ यात्रेच्या प्रारंभाला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुखही उपस्थित होते.

देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे समाजातील मोठा वर्ग नाराज आहे. त्यांना रस्ता दाखवण्यासाठी महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्गच योग्य आहे. ही जबाबदारी यशवंत सिन्हा यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. समाजात जागृती करण्यासाठी एकात्मता निर्माण करणं गरजेचं आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

नवी पिढी रस्त्यावर शांततेने येऊ पाहत आहे, मात्र त्यांना येऊ दिलं जात नाही आहे. जेएनयूमध्ये जे झालं त्याचा परिणाम आपण ठिकठिकाणी पाहत आहोत. त्यामुळेच बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला महात्मा गांधींचा मार्ग अवलंबणं गरजेचं असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

80 व्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या यात्रेचं कौतुक केलं पाहिजे. ही लढाई मोठी आहे, पण सरकार सहजासहजी ऐकेल असं वाटत नाही. सरकारने सहा महिन्यांपूर्वीच डिटेन्शन कॅम्प बांधले आहेत. हे एक प्रकारचं युद्ध असून ते शांततेनं लढावं लागेल. हा राजकीय लढा असल्याने तो राजकीय मंचावरच लढला पाहिजे. आपण संविधानासाठी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या अजेंड्यासाठी लढत आहे, असं प्रकाश आंबेडकर (Sharad Pawar Prakash Ambedkar Protests) म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI