Shiv Sena Case Hearing : शिवसेना कुणाची? न्यायामूर्ती बागची यांच्या त्या टिप्पणीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागचींनी 'घटनात्मक पापा'वर महत्त्वाची टिप्पणी केली. यावर संजय राऊत यांनी समाधान व्यक्त करत, धनुष्यबाण योग्य ठिकाणी मिळेल अशी आशा व्यक्त केली.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉयमाल्या बागची यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. ज्यांनी घटनात्मक पाप केले त्यांच्यासाठी पक्ष चिन्हाचे महत्त्व लागू होईल की ज्यांनी त्या घटनात्मक पापाविरोधात तक्रारी केली त्यांच्यासाठी? असा सवाल जॉयमाल्या बागची यांनी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना केला होता. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बागची यांनी केलेली टिप्पणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे धनुष्यबाण योग्य ठिकाणी जाईल, अशी आशा आहे, असं संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
न्यायामूर्ती बागची यांनी केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे. त्यांनी अनेक निरीक्षणं नोंदवले आहेत. फुटीरांना चिन्ह कसं देऊ शकता? पक्ष कसा देऊ शकता? तक्रारदाराची बाजू ऐकायची की घटनेशी द्रोह करणाऱ्यांची बाजू ऐकायची? आमची तक्रार ऐकायची नाही. ज्यांच्या विरोधात तक्रार केली त्या चोराला घटनात्मक संरक्षण द्यायचं. यावर बागची यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचं? यावर अत्यंत योग्य दिशेने सुनावणी सुरू आहे. त्यामुळेच योग्य ठिकाणी धनुष्यबाण दिला जाईल आणि पारदर्शक निकाल लागेल अशी आम्हाला आशा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आदिवासींच्या घामाचा वास…
यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. काही महिन्यांपासून नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांसाठी हे विद्यार्थी मुंबईत पोहोचले. त्यांना राहायला जागा नव्हती म्हणून टिळक भवनात राहिले. एवढंच खटकत होतं तर फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांची सह्याद्री गेस्टवर, आमदार निवासात किंवा एखाद्या हॉटेलात राहण्याची व्यवस्था करायची होती. तुम्हाला आदिवासींच्या घामाचा वास सहन होत नाही. टिळक भवनात व्यवस्था केली तेव्हा फडणवीस यांनी आदेश देऊन त्यांना फरफटत काढलं. आणि मुंबईच्या वेशीवर नेलं, असा आरोप राऊत यांनी केला.
फडणवीसांनी विद्यार्थ्यांना भेटावं
एमपीएससी आणि आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. विरोधी पक्षाचे नेते एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जाऊन आले. मुख्यमंत्री स्वत:ला राज्याचे पालक समजत असतील तर त्यांनीही आंदोलनाच्या ठिकाणी गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांना भेटलं पाहिजे. राज्यपालांनी जाऊन भेटलं पाहिजे. रोहित पवार आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत, करू द्या. पण प्रश्न महाराष्ट्राचा आहे. आंदोलनात फूट पाडणं हा मार्ग नाही. फडणवीस तिथे गेले तर काय बिघडेल? संवाद साधा मुलांशी. चार चार पाच लोकं फोडायचे आणि चर्चा करायची याला राज्याचं नेतृत्व म्हणत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.