योगी आदित्यनाथ आणि मुकेश अंबानी यांची भेट, विरोधकांना वेगळाच संशय, नक्की कशावर चर्चा?
योगींनी उद्योगपती मुकेश अंबानींचीही भेट घेतली. काही महिन्यांआधीच महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये गेल्यानं विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. आता योगींनी मुंबईत ग्लोबल समीट घेतल्यानं विरोधक निशाणा साधतायत.

मुंबई : उद्योगांवरुन आधीच महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आलेत. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले. निमित्त होतं, उद्योगासाठीची समीट आणि चित्रपटसृष्टीसाठी पुढाकार. त्यामुळं विरोधकांनी पुन्हा निशाणा साधलाय. विशेष म्हणजे उद्योजकांना निमंत्रण देण्यासाठी आणि चित्रपट नगरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले. उत्तर ग्लोबल इन्व्हेस्टर समीटमधून, योगींनी उद्योजकांना उत्तर प्रदेशात उद्योगांसाठी उद्योगपतींना निमंत्रण दिलं. आणि उत्तर प्रदेश कसं बदललं हे योगींनी उद्योजकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
योगींनी उद्योगपती मुकेश अंबानींचीही भेट घेतली. काही महिन्यांआधीच महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये गेल्यानं विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. आता योगींनी मुंबईत ग्लोबल समीट घेतल्यानं विरोधक निशाणा साधतायत.
उद्योगांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीसाठीही योगींचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी भेटीसाठीही झाल्यात. सुनील शेट्टी, बोनी कपूर, जॅकी श्रॉफ, मनोज जोशी, मधुर भांडारकर, सुभाष घई, कैलाश खेर आणि राजपाल यादवांची योगींनी भेट घेतली. पण मुंबईतून चित्रपटसृष्टी कुठेही जाणार नाही, असं शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर म्हणालेत.
योगी आदित्यनाथ राज्यपाल कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही राजभवनात भेटले. या बैठकीत योगींनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली.
मात्र योगींच्या मुंबई दौऱ्याकडे आणखी एक उद्देशातून पाहिलं जातंय. मुंबईत काही महिन्यांवरच महापालिकेची निवडून आहे. आणि मुंबईत उत्तर प्रदेशातील मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळं उत्तर भारतीय मतदारांकडे भाजपची नजर आहेच. तसंही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी योगींच्या एक दोन सभा होतातच. मात्र सध्या योगी गुंतवणुकीसाठी मुंबईत आलेत. मात्र आपले उद्योग कुठंही पळवले जाणार नाही, असा विश्वास महाराष्ट्रातले भाजपचे नेते व्यक्त करतायत.
