आमदार सुनील शिंदेंच्या गाडीला बेस्टची धडक, मुंबईतील घटना
ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या कारचा दादरमध्ये भीषण अपघात झाला. कारचे मोठे नुकसान झाले तरी आमदार शिंदे सुदैवाने बचावले. या अपघातामुळे पुन्हा एकदा बेस्ट बसेसच्या अपघातांच्या वाढत्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

MLA Sunil Shinde Car Accident : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये दादर परिसरात हा अपघात झाला आह. सुनील शिंदे यांच्या कारला बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात सुनील शिंदे बचावले आहेत.
नेमका कसा घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे हे प्रभादेवीला एका कार्यक्रमासाठी जात होते. ते दादर परिसरातून प्रभादेवीला जात असताना समोरुन एका बेस्ट बसने त्यांच्या कारला धडक दिली. यावेळी सुनील शिंदे हे त्यांच्या फॉर्च्युनर कारमध्येच बसले होते. अचानक समोरुन सुनील शिंदेच्या कारला बेस्टने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांच्या फॉर्च्युनर कारच्या पुढील भागचे नुकसान झाले. त्यांच्या कारच्या बोनेटच्या हेडलाईटचे नुकसान झाले.
सुदैवाने या अपघातात सुनील शिंदे थोडक्यात बचावले आहे. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा बेस्ट बस अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू
काही महिन्यांपूर्वी कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. कुर्ला डेपोतून आलेल्या इलेक्ट्रिक बस चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सीलेटरवरती पाय पडला. गाडीने एकदम 70 चा स्पीड घेतला आणि समोर येईल त्यांला उडवलं. कुर्ला येथे अनियंत्रित झालेल्या बेस्ट बस अपघातात आठ जण ठार तर ४० जण जखमी झाल्याची घटना घडली होती. तर दुसरीकडे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ बेस्टच्या एका बसने एका व्यक्तीला चिरडले होते. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता.
पाच वर्षात 834 अपघात
दरम्यान गेल्या पाच वर्षात बेस्ट ८३४ अपघात झाले आहेत. त्यात एकूण ८८ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या प्रकरणात बेस्ट प्रशासनाने १४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ तर २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती बेस्ट प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.
गेल्या ५ वर्षात ८३४ बेस्ट बस अपघात झाले आहे. यात बेस्ट आणि खाजगी कंत्राटदारांच्या बसेसचा यांचा समावेश आहे. बेस्टचे ३५२ अपघात घडले आहेत. यात जीवितहानीची संख्या ५१ आहे. तर खाजगी कंत्राटदारांच्या बसेसचे ४८२ अपघातात झाले आहेत. त्यात ३७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. वर्ष २०२२-२३ आणि वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक २१ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.