
लोकसभेनंतर विधानसभेतही भाजपला भरभरून मतं कशी पडली, असा खडा सवाल करत काल लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वादळ उठवले. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासह केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यांच्या सज्जड पुराव्यासह खणखणीत मांडणीमुळे कालच दिवस इंडिया आघाडीने गाजवला खरा. पण त्यात एका फोटोने मात्र महाराष्ट्रात राळ उडवून दिली. सत्ताधाऱ्यांच्या विशेषतः एकनाथ शिंदे शिवसेनेच्या हाती आयते कोलीत आले नि मग जो काही राडा सुरू आहे, त्याची विचारता सोय नाही. असे झाले तरी काय? तो फोटो पाहून एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच.
तो फोटो व्हायरल
तर राहुल गांधी यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत तुफान आणले. पुराव्यासह त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर राहुल गांधी थेट इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीतही त्यांनी पुरावे मांडले. त्यांची बाजू मांडली. मतांची गोळाबेरीज आणि मतांच्या हेराफेरीवर हिरारीने बोलले. त्याच दरम्यान आदित्य ठाकरे हे सर्व तल्लीन होऊन ऐकत असल्याचे एका फोटोतून दिसते. पण हा फोटोच टीकेचा धनी ठरला. या एका फोटोत ते अखेरच्या एका रांगेत बसलेले दिसतात. ही सहावी रांग होती. ही शेवटची रांग असल्याचे दिसते. त्यावरून मग शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट वॉर रंगवले. त्यांनी या फोटोवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला.
शीतल म्हात्रे यांची बोचरी टीका
“इंडी आघाडीत उद्धटराव, विश्वप्रवक्ते ,पेंग्विनची ही जागा … आता काही बोललं तर बोलणार की लायकी काढतात म्हणून…” अशी बोचरी टीका शीतल म्हात्रे यांनी केली. शीतल म्हात्रे यांनी उद्धव सेना सोडल्यानंतर त्या शिंदे सेनेत दाखल झाल्या. तेव्हापासून त्यांनी तलवार पाजळली आहे. त्यांच्या शाब्दिक फटकऱ्यांची यापूर्वी सुद्धा चर्चा झाली. त्यांनी ट्विटमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. त्यांच्या बोचऱ्या शब्दांनी आता वाद पेटण्याची शक्यता आहे.
इंडि आघाडीत उद्धटराव, विश्वप्रवक्ते ,पेंग्विनची ही जागा …
.
.
आता काही बोललं तर बोलणार की लायकी काढतात म्हणून …!!! pic.twitter.com/j4UpT7x1A7— sheetal mhatre (@sheetalmhatre1) August 7, 2025
अरे अरे काय ही तुमची किंमत
दुसरीकडे शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी तर अत्यंत बोचरी टीका केली. अरे अरे काय ही तुमची किंमत असे म्हणत नरेश म्हस्के यांनी उद्धव सेनेला चांगलेच चिमटे काढले. सहाव्या रांगेत बसल्याच्या फोटोवरून त्यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. शिवरायांचा वारसा सांगता मग काँग्रेसच्या बैठकीत सर्वात शेवटच्या रांगेत कसे बसलात असा खरमरीत सवाल त्यांनी केला आहे. काँग्रेसमुळे उद्धव सेनेची काय अवस्था झाली असा टोला त्यांनी लगावला.
आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…
#शिवरायांचा वारसा सांगता ना रे…
खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन
शेवटच्या रांगेत बसलात रे????#बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला
अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला
तुम्ही यातलं… pic.twitter.com/9pr7sDwwqX— Naresh Mhaske (@nareshmhaske) August 8, 2025
मग भाजपने काढला चिमटा
आयती संधी मिळताच भाजपने मग या वादात उडी घेतली. त्यांनी सुद्धा उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे युतीत भाजपसोबत होते तेव्हा मातोश्री आणि उद्धव ठाकरेंना सन्मान होता, आदरातिथ्य होतं. मातोश्रीवर जात भाजप नेते सन्मान देत होते. खुद्ध अमित शाह लोकसभेला मातोश्रीवर गेले होते आणि चर्चा केली होती. २०२५ ला काय आहे परिस्थिती? हिंदुत्व सोडलं विचारधारा सोडली कांग्रेससोबत राहिले. गेल्या २-३ वर्षात आठवलं आहे का की कांग्रेस नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट म्हंटलं आहे. राहुल गांधी सोनिया गांधी कधी मातोश्रीवर आल्यात? नाही, हिंदुत्व, विचारधारा सोडली पदरात पडलं काय? शेवटची रांग.” असा चिमटा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काढला.