मातोश्रीच्या आवारात पुन्हा आढळला साप, परिसरात खळबळ
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी साप आढळल्याची माहिती समोर आली आहे.

Matoshree Bungalow Snake Found : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी साप आढळल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्वरित सर्पमित्रांना बोलवण्यात आले. या सापाला रेस्कू करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्प मित्रांचे आभार मानले.
नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण
प्राथमिक माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानच्या परिसरात साप आढळला आहे. साधारण दुपारच्या दरम्यान ही घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. यानंतर सर्प मित्राच्या मदतीने सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे हे गेल्या कित्येक वर्षांपासून सहकुटुंब मातोश्री या निवासस्थानी राहतात. वांद्रे परिसरातील कलानगर भागात ठाकरे कुटुंबियांचा मातोश्री हा बंगला आहे. हा परिसर खाडीवर वसलेला असून त्या ठिकाणी अनेक झाडे-झुडूप आहेत. त्यामुळे याआधीही अनेकदा मातोश्री निवासस्थानच्या परिसरात साप आढळण्याच्या घटना घडल्या आहेत.
यापूर्वीही आढळला होता विषारी साप
दरम्यान याआधीही गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या वांद्र्यातील मातोश्री बंगल्याच्या परिसरात विषारी साप शिरल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्री बंगल्याच्या आवारात दुपारच्या सुमारास कोब्रा शिरला होता. या सापाची लांबी साधारण चार फूट इतकी होती. हा साप पाण्याच्या टाकीच्या मागे वेटोळे घालून बसला होता.
हा साप दिसताच तातडीने वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोशिएशन संस्थेला फोन करुन सर्पमित्रांना बोलवण्यात आले. मातोश्री बंगल्याच्या आवारात एक साप फिरत आहे. त्यासाठी आम्हाला सर्पमित्राची मदत हवी आहे, असा निरोप मातोश्रीवरुन सांगण्यात आला. त्यानंतर अतुल कांबळे आणि रोशन शिंदे हे दोन सर्पमित्र तातडीने मातोश्री बंगल्यावर पोहोचले. त्यांनी या नागाला सुरक्षितपणे पकडले. त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला होता. त्यानंतर सर्पमित्रांनी या सापाला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून दिले होते.
