मुंबईत बाप-लेकाचा ‘इट अँड रन’चा विचित्र प्रकार समोर

मुंबईत बाप-लेकाचा 'इट अँड रन'चा विचित्र प्रकार समोर

मुंबई : मुंबई नामक या मायानगरीत काय होईल, हे कुणाला काही सांगता येणार नाही. मुंबईत आता बाप-लेखाचा ‘इट अँड रन’ असा विचित्र प्रकार समोर आला आहे. या बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. पंचतारांकित  हॉटेलमध्ये जाऊन जेवायचे आणि बिल न देता पसार व्हायचे. मात्र मोठ्या हॉटेलच्या जेवणाच्या नादात आता त्यांना तुरुंगात जेवण करावं लागणार आहे.

कांदिवलीमध्ये राहणारे सुहास नेरळेकर (वय 57) आणि स्वप्नील नेरळेकर (वय 32) या बाप-लेकाच्या जोडीला कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. यांच्या अटकेचं कारण अगदी विचित्र आहे. कुणाला काय आणि कसली हौस असेल, याचा काही नेम नाही. आपली हौस पुरवण्यासाठी काही लोक काय करतील, याचाही  काही नेम नाही. साधारण लोकांना भूक  लागली असेल आणि पैशांची कमतरता असेल तर ते वडापाव खाऊन सुद्धा पोट भरतात. पण मुंबईतील बाप-लेकाने भयंकर शक्कल लढवली आहे.

पंचतारांकित हॉटेलमध्ये  जेवण करायचं आणि तिथे पैसे न देता पसार होऊन जायचं, अशी आरोपी बाप-लेकाची भयंकर शक्कल आता त्यांनाच महागात पडली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, स्वतःला उद्योगपती किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा अधिकारी भासवून हॉटेलमध्ये रुम बुक करायचे, त्यासाठी हॉटेलची गाडी मागवायचे आणि चेक इन करण्याआधी भूक लागली असून जेवण मागवायचे आणि जेवून बिल न भरता पसार होऊन जायचे.

अजब कारनामे करणाऱ्या या बाप-लेकाचा हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा ताज ग्रुपच्या विवांता हॉटेलमध्येही बाप-लेकाची जोडी पोहचली आणि जेऊन पसार होण्याआधीच त्यांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी अडवलं. त्यांना जेवणाचे बिल 8,831 रुपये भरुन तुम्ही जाऊ शकता असे सांगितले. पण पैसे भरण्यास या जोडीने नकार दिला. हॉटेल मॅनेजमेंटने पोलिसात तक्रार केली आणि तपासत उघड झाले की नेरळेकर जोडीचं हे नित्य-नेमाचं काम आहे. याआधी संताक्रुझ आणि कोलाबाच्या ताजमहल पॅलेसमध्ये सुद्धा 32,000 रुपयाचे जेवणाचे बिल थकीत ठेऊन हे दोघे पसार झाले होते. या संपूर्ण प्रकरणामध्ये हॉटेल हे पंचतारांकित आहेत म्हणून पोलीस अधिकारी समोर येऊन काहीच बोलायला तयार नाहीत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI