
लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असे वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले होते. कर्जमाफीवरून त्यांची खळखळ उभ्या महाराष्ट्रानं पाहिली. पण आता तेच पाटील उदार झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा धागा पकडून त्यांनी कार्यकर्त्यांना मोठे आवाहन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना पैशांची तर अजिबात चिंता करू नका, तुमच्यासाठी बँकाच खाली करू असे दणक्यात आश्वासन देऊन टाकले आहे. त्यामुळे बँकांचा वापर कशासाठी करण्यात येतो हे मनातील इंगित त्यांच्या ओठांवर आपसूकच येऊन ठेपलं आहे. त्यांच्या या नवीन वक्तव्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
कर्जमाफीचं वक्तव्य आठवते ना?
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सध्या अचानक सक्रिय झाल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनमोकळ्या गप्पागोष्टी राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी चोपडा तालुक्यात घोडगाव येथे पीपल्स बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी मोठे वक्तव्य केले होते. लोकांना कर्जमाफाचा नाद लागल्याचे संतापजनक वक्तव्य त्यांनी केले होते. निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या अशी मागणी केल्यास निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिले जाते, असे सांगत त्यांनी मतदारांना कसं वेड्यात काढण्यात येतं, याचे वांगणीदाखल उदाहरण दिले होते. त्यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती.
आता म्हणतात तुमच्यासाठी बँका खाली करू
दरम्यान नांदेड येथील राष्ट्रवादी पक्षाच्या एका कार्यक्रमात बाबासाहेब पाटील, कार्यकर्त्यांसाठी मात्र उदार झाल्याचे दिसले. त्यांचा हा दिलदारपणा शेतकऱ्यांच्या वाट्याला आला नसला तरी, तो कार्यकर्त्यांच्या वाट्याला नक्कीच आल्याचे दिसले. तुम्ही निवडणुकीत उभे राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू असे वक्तव्य त्यांनी मिश्किलपणे केले. पण अगोदरच्या त्यांच्या वक्तव्यामुळे या मिश्किल वक्तव्याची अर्थछटा बदलली आणि पाटील यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
आपण बोलण्याच्या ओघात काय बोलून गेलो, हे चाणक्ष मंत्रिमहोदयांच्या लक्षात यायला काही वेळ लागला नाही बरं का. त्यांनी तातडीने शब्दांची गोळाबेरीज केली. शब्दांना नवीन अर्थाचा मुलामा चढवला. आपण विकासासाठी बँका खाली करून टाकू असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता हे जाता जाता ते सांगायला विसरले नाहीत. पण आपण नेहमी म्हणतो तसे ‘जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती ‘, याचा त्यांना कायम का विसरत पडतो हेच जनतेला कळत नाही.