सुशांतच्या मृत्यूनंतर 80 हजार फेक अकाऊंट्स काढावी, हा किळसवाणा प्रकार : सुप्रिया सुळे

सुशांतच्या मृत्यूनंतर 80 हजार बनावट अकाऊंट्स तयार करून त्याचा राजकारणासाठी वापर करणं हे अत्यंत खेदजनक आणि धक्कादायक आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. (Supriya Sule On Sushant Sinh Rajput Case Fake Account) 

सुशांतच्या मृत्यूनंतर 80 हजार फेक अकाऊंट्स काढावी, हा किळसवाणा प्रकार : सुप्रिया सुळे
Akshay Adhav

|

Oct 06, 2020 | 8:32 PM

मुंबई : मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले, असा दावा मुंबई पोलिसांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी बोलताना चिंता व्यक्त करत एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर 80 हजार बनावट अकाऊंट्स तयार करून त्याचा राजकारणासाठी वापर करणं हे अत्यंत खेदजनक आणि धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. (Supriya Sule On Sushant Sinh Rajput Case Fake Account)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एखाद्याच्या मृत्यूनंतर 80 हजार फेक अकाऊंटस काढण्यात आली आणि एका पक्षाने त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न केला. हे चित्रच निव्वळ धक्कादायक आणि किळसवाणं आहे”

“तुमचा सत्ताधारी पक्षावर राग असेल. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर यायचं असेल. पण असं कृत्य करून त्या दिशेने पावले टाकणे हा किळस आणणारा प्रकार आहे. आपली संस्कृती इतक्या खालच्या पातळीवर गेलीये, हे आपल्यासाठी अत्यंत खेदजनक आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हाथरसप्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला तसंच पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उभं केलं. पीडित कुटुंबाला भेटायला गेलेल्या नेत्यांशी सरकार आणि प्रशासन ज्या पद्धतीने वागलंय त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी आहे. प्रशासन आणि पोलिसांचं नेत्यांशी वागणं धक्कादायक असल्याचं सांगत याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद होती, असं सुळे म्हणाल्या.

मुंबई आणि राज्यातल्या क्राईमवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रातला सध्याचा क्राईम डेटा गृहमंत्र्यांनी आणि त्यांच्या दोन्ही राज्यमंत्र्यांनी आम्हा सर्वपक्षीय नेत्यांपुढे मांडला आहे. आम्ही गृहमंत्र्यांना विनंती केलीये की हा डेटो मीडियाला देखील द्यावा जेणेकरुन तो लोकांसमोर येईल.”

मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सायबर सेलने आयटी कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करुन अधिक चौकशी सुरु केली आहे. मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सुरु असलेल्या अभियानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता सायबर सेल या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु करत आहे, असं मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे. (Supriya Sule On Sushant Sinh Rajput Case Fake Account)

संबंधित बातम्या

80 हजार फेक अकाऊंट खोलून मुंबई पोलिसांची बदनामी, फेसबुक आणि ट्विटरने याची माहिती जाहीर करावी : महेश तपासे

Mumbai | मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र – मुंबई पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद

Sharad Pawar | शरद पवार आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात महत्त्वाची चर्चा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें