
विरोधी पक्षांनी मत चोरीवरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. राज्यात शेतकऱ्यांचंही आंदोलन सुरू आहे. सरकारविरोधात वातावरण तापवण्यात येत आहे. अनेक घटनांवरून सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी एका लेखातून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सध्याचा कालखंड लोकशाहीसाठी मारक असल्याची टीका केली. शिवविधी दर्पणच्या अंकात त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहेत. त्यात महायुती सरकारला लक्ष्य केले आहे.
सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा
लोकशाहीत मत आणि विरोध व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, आजच्या सत्ताधाऱ्यांना ते मान्य नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या शिव विधी व न्याय सेनेच्या शिवविधी दर्पणच्या अंकात उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले.शिव विधी न्याय विभागाचा काल वर्धापन दिन झाला. या निमित्ताने अंकाचे अनावरण करण्यात आलं यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
अधिकारांवर आक्रमण करणारे कायदे
शिवसेनाप्रणीत शिव विधी आणि न्याय सेनेने आता चांगलेच बाळसे धरले आहे. त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती माझ्यापर्यंत येत असते. विशेषतः अनेक विषयांवर पुढाकार घेऊन समाजाला मदत होईल अशी कृती त्यांच्याकडून होत आहे. सध्याचा कालखंड लोकशाहीला मारक आहे. राजकीय कार्यकर्त्याच्या अधिकारांवर आक्रमण करणारे कायदे बनविले जात आहेत असा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला.
व्यक्तीस्वातंत्र्याची पूर्ण गळचेपी सत्तेच्या यंत्रणांमार्फत सुरू असताना, शिवसेनाप्रणीत न्याय-विधी सेनेला भविष्यात अनेक लढे लढावे लागतील. लोकशाहीत मत आणि विरोध व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, आजच्या सत्ताधाऱ्यांना ते मान्य नाही.अशा वेळी कायद्याचे रखवालदार म्हणून वकील मंडळीना निर्भयपणे पुढे यावे लागेल. लोकांना जागरूक करावे लागेल. लढणाऱ्या सामान्य जनांवरील अन्याय दूर करण्यासाठी विधी व न्याय सेनेला झटावे लागेल असे आवाहन त्यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच महायुतीविरोधात आरोपांना आणि विरोधाला चांगलीच धार आल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच ठाकरेंच्या लेखणीला पण धार आल्याचे दिसून येत आहे.
1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा
दरम्यान 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर विरोधी पक्ष मोर्चा काढणार आहे. मतदार यादीतील घोळाविरोधात हा मोर्चा निघणार आहे. मुंबईत विराट मोर्चा काढण्याचा संकल्प महाविकास आघाडीसह मनसेने सोडला आहे. त्यापूर्वी या पक्षांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. त्यात मोर्चाचे नियोजन करण्यात येईल.