राज ठाकरे यांची अवस्था हसण्यासारखी…गुणरत्न सदावर्तेंची बोचरी टीका, अशी उडवली आरोपांची राळ 

Gunaratna Sadavarte : राज ठाकरे -उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी हिंदीविरोधात एकत्र येणार आहे. याप्रकरणात गुणारत्न सदावर्ते यांनी आरोपांची राळ उडवून दिली आहे. त्यांची मनसे नेते प्रकाश महाजन यांचीशी खडाजंगी झाली.

राज ठाकरे यांची अवस्था हसण्यासारखी...गुणरत्न सदावर्तेंची बोचरी टीका, अशी उडवली आरोपांची राळ 
गुणरत्न सदावर्ते यांची बोचरी टीका
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 27, 2025 | 1:37 PM

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी हिंदीविरोधी आंदोलनात एकत्र येणार आहेत. त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. याप्रकरणावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आरोपांची राळ उडवून दिली आहे. त्यांनी हा गल्लीतील निवडणुकीसाठी मोर्चा असल्याचा आरोप केला. टीव्ही 9 मराठीच्या चर्चेदरम्यान त्यांची मनसे नेते प्रकाश महाजन यांच्याशी चांगलीच खडाजंगी झाली. त्यांनी यावेळी राज ठाकरे यांची राज्यातील अवस्था हसण्यासारखी झाल्याची बोचरी टीका केली.  काय म्हणाले सदावर्ते?

हा तर गल्लीतील निवडणुकीसाठीचा मोर्चा

भाजपा सरकारची बाजू घेत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी 2020 मधील अहवालाचा दाखला देत त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केला. तर मराठी हीच महाराष्ट्राची भाषा असल्याचे सांगितले. हिंदी ही ऐच्छिक भाषा असल्याचे ते म्हणाले. गल्लीतील निवडणुकीसाठीचा हा मोर्चा असल्याचा आरोप त्यांनी केला. हा मोर्चा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काढण्यात येत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला.

खोट्या नरेटीव्हला आमचा विरोध

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खोटे नरेटीव्ह पसरवत आहेत. त्याला आमचा विरोध असल्याचे सदावर्ते म्हणाले. ठाकरेंचा मोर्चा अन्यायकारी आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, त्यांना मोर्चा काढता येणार नाही. त्यांचा हा मोर्चा बेकायदेशीर आहे. त्यांना असा मोर्चा काढता येणार नाही असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. त्यांनी राज ठाकरे यांचे राज्यातील अवस्था हसण्यासारखी झाल्याचे वक्तव्य केले. त्यांनी हा मोर्चा काढता येणार नाही असे म्हटले आहे.

प्रकाश महाजन यांच्यासोबत खडाजंगी

चर्चेदरम्यान मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यासोबत सदावर्ते यांची खडाजंगी झाली. प्रकाश महाजन यांनी हा कोण मुंबईचा फौजदार असा उल्लेख केल्यावर सदावर्ते यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांना मोर्चा काढता येणार नाही असे ते म्हणाले. यावेळी प्रकाश महाजन यांनी सदावर्ते हे शासनाचे दलाल असल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शा‍ब्दिक खडाजंगी झाली.