दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; शिवसैनिकांना काय दिले आदेश?

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसैनिकांनी होर्डिंग, बॅनर लावू नयेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत, ठाकरे बंधू 26 जुलै रोजी केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त मोर्चा काढणार आहेत.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; शिवसैनिकांना काय दिले आदेश?
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 11:51 AM

गेल्या 34 दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं जोरदार आंदोलन सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून तर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. हजारो विद्यार्थी दिल्लीत जमा आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या मागणीसाठी तरुणांनी सोमवारी जंतरमंतरवर आंदोलन केलं. यावेळी तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सर्वच स्तरातून कारवाईचा निषेध नोंदवला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही हारतुरे आणू नयेत, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. पण यावर्षी त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. वाढदिवसानिमित्त होर्डिंग, बॅनर लावू नका, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

अशा वातावरणात उत्सव नको

अशा वातावरणात कोणताही उत्सव साजरा करता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एक देश, एक भावना हेच सगळ्यांचे सूत्र असावे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ 26 जुलै रोजी मोर्चाची हाक दिली आहे. ठाकरे बंधुंचं हा संयुक्त मोर्चा असणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही बंधू या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. हा मोर्चा अत्यंत मोठा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ठाकरेंचं आंदोलन

दरम्यान, याआधी उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांना संबोधित केलं होतं. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी आणि शिवसैनिक जमले होते. केंद्र सरकारचा निषेध नोंदवतानाच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली होती.

जंतरमंतरवर ठाकरे

त्यानंतर उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले होते. त्यांनी जंतरमंतरवर जाऊन अभिजीत दीपके यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांशी संवाद साधला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांची दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भेट झाली. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती.

Follow Us