पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला टोला

| Updated on: Oct 28, 2021 | 1:23 PM

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे. (Uddhav Thackeray targets BJP over fuel price hike)

पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला टोला
CM Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई: इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.

एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतोय हे केंद्राच्याही लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढं वाढलं, डिझेलचे भाव तेवढे झाले. तसं नाहीये. हे आपल्या भल्यासाठीच होतंय, असा चिमटा काढतानाच मी काही बोललो तर टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो असं म्हणता. पण मी खरं की खोटं बोलतो हे तुम्ही सांगा. इंधन परवडेनासं झालं तर तुम्ही म्हणतात तसं प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही? म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

सोयी सुविधा देताना राजकारण नाही

थोड्यावेळापूर्वी एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन यांच्याशी बोलणं झालं. त्यांना मी म्हटलं, वाहतूक व्यवस्थेचा तुम्ही अभ्यास केला ना. त्यावर ते म्हणाले, हो केला. खरं तर अभ्यास करण्याचं काम आमचं असतं तर आम्ही राजकारणात आलोच नसतो. मार्क देण्याचं काम आमच्याकडे आलं आहे. साहजिकच आहे शासन, प्रशासन आपल्या सर्वांची जबाबदारी एक असते. अशावेळी राजकारण एका बाजूला ठेवायचे असते. जनतेला सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे. ते पार पाडताना त्यात राजकारण येऊ नये. येऊ देणारही नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. वाहतूक व्यवस्था ही जशा आपल्या शरीरात रक्तवाहिन्या असतात तशा या शहराच्या वाहिन्या आहेत. एमएमआर रिजनची लोकसंख्या ऑस्ट्रेलिया एवढी आहे. ऑस्ट्रेलिया एवढा महाकाय देश. त्याच्याएवढी लोकसंख्या आपल्या एवढ्याश्या भागात सामावलेली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

मुंबईत अॅटोमॅटिक लोकल सेवा

मुंबईत त्यावेळी ट्राम्स होत्या. पुण्यात घोडागाड्या होत्या. त्यातून फिरणं ही गंमत असायची. मी लोकल आणि बेस्ट बसेसमधूनही प्रवास केला आहे. बाहेरच्या देशात ज्या सुविधा आहेत त्या आपण आता आता आणत आहोत. पण आपल्याकडे अॅटोमॅटिक लोकल सेवा आधीच होती. ती जगात कुणाकडेही नाही. अॅटोमॅटिक लोकल सेवा म्हणजे प्रवासी स्टेशनला उभा राहिला तर तो लोकलमध्ये आपोआप ढकलला जातो आणि बाहेरही आपोआप फेकला जातो. ही सेवा जगात कुठेच नाही. आपली सेवा ऑटो रेल झाली आहे. हा बाहेरच्या लोकांसाठी अभ्यासाचा विषय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

त्याला मीही जबाबदार

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांचा टक्का घसरत आहे. त्याबद्दल आपण चिंता व्यक्त केली. सार्वजनिक वाहतूक यामधला प्रवाशांचा टक्का घसरला त्याला दोन कारणं आहेत. गेल्या दीड वर्षातील कोरोनाची परिस्थिती हे एक कारण असेल. दुसरं कारण मीही असेल. मीच लॉकडाऊन लावला होता. टक्का घसरला होता तो कोरोनाने किती घसरला हे थोड्या दिवसाने कळेल, असंही ते म्हणाले.

स्वच्छतेचा कानमंत्र

सगळे मार्ग खड्डे मुक्त असले पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ आणि टापटीप हवी. आपली मेट्रो स्टेशन अप्रतिम आहेत. मी ही स्टेशनं पाहिल्यानंतर माझाही त्यावर विश्वास बसला नाही. अशा मेट्रो आल्यातर मेट्रो, बस, लोकलमधून कुणालाही प्रवास करायला आवडेल, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद, बहिणीचे लग्नही मुस्लिम रिवाजाने, समीर वानखेडेंच्या पहिल्या सासऱ्याकडून पोलखोल

समीर वानखेडेंची चौकशी करणारी टीम चुकांवर पांघरून घालणारी नसावी, जयंत पाटलांचा खोचक टोला

MPSC चा धडाका सुरुच, महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, PSI, कक्ष अधिकारी, कर निरीक्षकच्या 666 पदांसाठी जाहिरात

(Uddhav Thackeray targets BJP over fuel price hike)